
मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर शुभमन गिलचा एक फोटो अचानक व्हायरल झालाय. त्याच्या कानाजवळ एक विचित्र गॅजेट पाहून क्रिकेट फॅन्सना मोठा प्रश्न पडलाय. गिलला काही आजार तर झाला नाही ना, अशी शंका अनेकांच्या मनात येत आहे. भारत-न्यूझीलंड क्रिकेट मॅचमध्ये गिल डोक्यावर एक छोटं डिव्हाइस लावून मैदानात पळताना दिसला.
शुभमन गिलच्या कपाळाजवळ लावलेल्या या छोट्या मेटॅलिक रंगाच्या डिव्हाइसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. हे एखादं मेडिकल मशीन आहे की फिटनेस ट्रॅकर, असा प्रश्न अनेकांना पडलाय. खरं तर या डिव्हाइसचं नाव 'Temple' (टेम्पल) असं आहे. हे एक अत्याधुनिक वेअरेबल हेल्थ-टेक डिव्हाइस आहे. झोमॅटोचे सह-संस्थापक दीपंदर गोयल यांच्या पुढाकाराने हे तयार करण्यात आलंय.
आपले साधे स्मार्टवॉच फक्त हार्ट रेट, झोप आणि शारीरिक हालचालींचा ट्रॅक ठेवतात. पण Temple डिव्हाइसचा मुख्य उद्देश मेंदूमधील रक्तप्रवाहातील बदल आणि शरीराचे इतर संकेत मॉनिटर करणं हा आहे. कपाळावर कानाजवळ लावलेलं हे डिव्हाइस लाइट-बेस्ड सेन्सरच्या मदतीने रक्तप्रवाहातील बदलांची माहिती गोळा करतं. यातून खेळाडूची शारीरिक मेहनत, मानसिक ताण, फोकस आणि आरामाच्या वेळी शरीराची प्रतिक्रिया कशी असते, हे समजायला मदत होते.
क्रिकेटसारख्या खेळात जास्त वेळ फोकस ठेवणं आणि शारीरिक थकवा मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे तंत्रज्ञान खेळाडूंची ट्रेनिंग आणि रिकव्हरी समजून घ्यायला खूप फायदेशीर ठरू शकतं. बॅडमिंटन स्टार पी. व्ही. सिंधू सुद्धा हे डिव्हाइस वापरताना दिसली होती.
रिपोर्ट्सनुसार, भारतात या डिव्हाइसची किंमत जवळपास ८५ हजार रुपये आहे. १ नोव्हेंबरपासून याचं प्री-बुकिंग सुरू झालंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हे कोणतंही रेग्युलर ब्रेन स्कॅनर किंवा EEG नाही. मेंदूचे आजार शोधण्यासाठी किंवा उपचारांसाठी याचा वापर करता येत नाही. याच्या फायद्यांबद्दल आणि आरोग्याशी संबंधित दाव्यांवर अजूनही वैज्ञानिक संशोधन सुरू आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.