
मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे दिग्गज खेळाडू असणं हे आपलं नशीब असल्याचं म्हटलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत ४०६ धावांचा पाठलाग करताना शुभमनने नाबाद २२३ धावांची विक्रमी खेळी केली होती. तिसऱ्या वनडेपूर्वी जिओस्टारच्या 'फॉलो द ब्लूज'वरील 'द शुभमन शो'मध्ये बोलताना त्याने आपल्या कॅप्टन्सीच्या पद्धतीवरही प्रकाश टाकला. सर्वांचं ऐकून घेण्यावर आपला भर असतो, असं तो म्हणाला.
गुरुवारी २०२७ च्या क्रिकेट वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर गिलने ही प्रतिक्रिया दिली आहे. आयसीसी मेन्स वनडे वर्ल्ड कप २०२७ मध्ये भारत आपला पहिला सामना ७ ऑक्टोबरला केपटाऊनमध्ये गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. तर, १० ऑक्टोबरला जोहान्सबर्गमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. या १४ संघांच्या स्पर्धेत भारताला ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि क्वालिफायर ए सोबत ठेवण्यात आलं आहे. ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये संयुक्तपणे खेळवली जाईल.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली असून एक सामना अजून बाकी आहे. या मालिकेत रोहित आणि विराटनेही खोऱ्याने धावा काढल्या आहेत. तिरुवनंतपुरममध्ये २९९ धावांचा पाठलाग करताना विराटने ८८ चेंडूत नाबाद १३९ धावा ठोकल्या. तर गुवाहाटीमध्ये ४०६ धावांचा पाठलाग करताना रोहितने ७५ चेंडूत १०१ धावांची खेळी केली आणि गिलसोबत २५५ धावांची भागीदारी रचली. या दोघांबद्दल बोलताना गिल म्हणाला, "मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. विराट भाई हा बहुधा जगातील सर्वोत्तम वनडे फलंदाज आहे आणि रोहित भाई सर्वोत्तम वनडे ओपनर आहे. या दोघांचा अनुभव आणि त्यांनी एकत्र घालवलेले क्षण संघासाठी खूप महत्त्वाचे आहेत. त्यांना संघात पाहणं आमच्यासाठी खूप आनंददायी असतं आणि त्यांचा अनुभव आमच्यासाठी खूप मोलाचा आहे."
या वर्षात रोहितने ११ वनडे सामन्यांच्या ११ डावांमध्ये ४६.५४ च्या सरासरीने ५१२ धावा केल्या आहेत. यात दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश असून १३८ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. दुसरीकडे, विराटने या वर्षात ८ वनडे सामन्यांच्या ८ डावांमध्ये ७८.८५ च्या सरासरीने ५५२ धावा कुटल्या आहेत. यात दोन शतके आणि तीन अर्धशतके असून नाबाद १३९ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
गिलने पुढे सांगितलं की, तो सल्ल्यासाठी फक्त विराट आणि रोहितवर अवलंबून राहत नाही, तर अनेकदा केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याशीही चर्चा करतो. तो म्हणाला, "मी फक्त या दोघांकडेच सल्ल्यासाठी जातो असं नाही; मी केएल किंवा श्रेयसकडेही जातो. मला सर्वांचं मत जाणून घ्यायला आवडतं. पण शेवटी, जर मला वाटलं की, 'अरे, ही गोष्ट माझ्या डोक्यातून निसटली होती', तरच मी त्यांचा सल्ला घेतो. बहुतांश वेळा असं होतं की, ते जे सुचवायला येतात, त्याचा विचार मी आधीच केलेला असतो. जर मी विचार केला नसेल, तर मी त्यांच्या मतांवर विचार करतो. सर्वांचं ऐकून घेणं, ते काय विचार करत आहेत हे पाहणं आणि त्या परिस्थितीत माझ्या मते काय योग्य ठरेल हे ठरवणं, यातूनच मला खूप काही शिकायला मिळतं."
या वर्षात ११ वनडे सामन्यांच्या १० डावांमध्ये गिलने १२७.७१ च्या सरासरीने आणि ११९.५१ च्या स्ट्राईक रेटने ८९४ धावा केल्या आहेत. यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश आहे. गिलने आतापर्यंत ६९ वनडे सामन्यांच्या ६८ डावांमध्ये ६५.१२ च्या सरासरीने आणि १०३ पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ३,७१२ धावा केल्या आहेत. यात ११ शतके आणि २० अर्धशतकांचा समावेश आहे.