
मुंबई : भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतासाठी टेस्ट क्रिकेट खेळण्याचं आपलं स्वप्न आता कधीच पूर्ण होणार नाही, याची जाणीव झाल्याने ३६ वर्षीय चहलने हा मोठा निर्णय घेतला. पण, तो व्हाईट बॉल (वनडे आणि टी-२०) क्रिकेट खेळणं सुरूच ठेवणार आहे. भारतीय संघात पुन्हा एकदा जागा मिळवण्यासाठी आपला संघर्ष सुरूच राहील, असंही त्याने स्पष्ट केलं.
सोशल मीडियावर एका भावुक पोस्टद्वारे चहलने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून लॉर्ड्सवर मिडलसेक्सविरुद्ध खेळलेला सामना हा त्याच्या करिअरमधला शेवटचा फर्स्ट क्लास सामना ठरला. चहलने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय, "मी १० वर्षांचा असताना पहिल्यांदा हातात लाल चेंडू घेतला होता. तेव्हा मला वाटलं नव्हतं की या खेळावर मी इतकं प्रेम करू लागेन. लाल चेंडूच्या क्रिकेटने मला संयम, डिफेन्स आणि तासनतास क्रीजवर उभं राहून लढायला शिकवलं. भारताची टेस्ट कॅप घालणं हे माझं नेहमीच स्वप्न होतं. ते पूर्ण होऊ शकलं नसलं, तरी लाल चेंडूने दिलेल्या आठवणींमध्ये मी समाधानी आहे. पण, माझ्यातला योद्धा अजून संपलेला नाही. देशासाठी वनडे आणि टी-२० मध्ये कमबॅक करण्याची भूक माझ्यात अजूनही कायम आहे." आपल्या या प्रवासात मोलाची साथ दिल्याबद्दल त्याने हरियाणा क्रिकेट असोसिएशन आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
चहलने २००९ मध्ये हरियाणाकडून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याने ४९ सामन्यांमध्ये ३२.२७ च्या सरासरीने १४८ विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लिश काउंटीमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याने जबरदस्त कामगिरी केली. शेवटच्या सीझनमध्ये त्याने १६.१४ च्या सरासरीने २१ विकेट्स खिशात घातल्या. भारतासाठी ७२ वनडे आणि ८० टी-२० सामने खेळलेला चहल २०२४ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही भाग होता. त्याने ऑगस्ट २०२३ मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. आयपीएलमध्ये सध्या पंजाब किंग्सकडून खेळणारा चहल या लीगमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.