
बर्मिंगहॅम : भारतीय संघाचा युवा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रमी द्विशतक झळकावत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला आहे. गिलने या शानदार खेळीत तब्बल २६९ धावा करत ४६ वर्षांपूर्वीचा सुनील गावस्कर यांचा ऐतिहासिक विक्रम मोडला आहे.
1979 मध्ये द ओव्हलवर सुनील गावस्कर यांनी झळकावलेल्या 221 धावांचा विक्रम आजवर कोणालाही मोडता आलेला नव्हता. मात्र, शुबमन गिलने इंग्लिश गोलंदाजांची धुलाई करत 269 धावांची ऐतिहासिक खेळी साकारली आणि गावस्कर, द्रविड (217), सचिन (193), शास्त्री (187) यांच्यासारख्या दिग्गजांनाही मागे टाकले.
या सामन्यात शुबमन गिलने कसोटी कारकिर्दीत पहिल्यांदाच 200+ धावा करत कर्णधार म्हणूनही एक विशेष विक्रम आपल्या नावे केला. तो इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात द्विशतक करणारा केवळ तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
तसेच, 25 वर्षे 298 दिवसांचे असताना हे द्विशतक झळकावून, गिलने ‘कसोटीमध्ये द्विशतक करणाऱ्या सर्वात तरुण भारतीय कर्णधारांपैकी एक’ म्हणून स्वतःचे स्थान निश्चित केले आहे. याआधी हे यश मन्सूर अली खान पतौडी (वय 23) यांनी मिळवले होते.
SENA म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा गिल पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. या आधी श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशान यांनी 193 धावा केल्या होत्या.
गिलने यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबत महत्वाच्या भागीदाऱ्या केल्या. विशेषतः, जडेजासोबतच्या सहाव्या विकेटसाठी 203 धावांची भागीदारी सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरली.
शुबमन गिलची ही खेळी फक्त एक विक्रम नाही, तर भारतीय क्रिकेटसाठी प्रेरणादायी क्षण आहे. त्याने सिद्ध केले की, युवा पिढीही इतिहास घडवू शकते. आता गिलकडे पाहिले जातेय एक दीर्घकाळचा कसोटी कर्णधार म्हणून.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.