
Shreyas Iyer Health Update : भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असल्याचे वृत्त आहे. मालिकेनंतर तो भारतात परतला नव्हता. बरगडीला झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस सिडनीतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. तपासणीत श्रेयसला अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याचे समोर आले आहे, असे वृत्तसंस्था प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने (पीटीआय) म्हटले आहे. त्यामुळे तो गेल्या दोन दिवसांपासून आयसीयूमध्ये आहे. दरम्यान, त्याला भेटण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी अर्जंट व्हिसा मिळण्याची मागणी केली आहे.
ड्रेसिंग रूममध्ये त्याच्यावर तातडीने उपचार झाले नसते, तर ही दुखापत जीवघेणी ठरली असती, असे अहवालात उघड झाले आहे. श्रेयसला किमान एक आठवडा रुग्णालयात राहावे लागणार आहे. पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे की, ''गेल्या दोन दिवसांपासून श्रेयस आयसीयूमध्ये होता. वैद्यकीय अहवालानुसार त्याला अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. रक्तस्त्रावामुळे संसर्ग पसरू नये म्हणून त्याला दोन ते सात दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. संघाचे डॉक्टर आणि फिजिओने श्रेयसला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल करून परिस्थिती नियंत्रणात आणली, अन्यथा ही दुखापत जीवघेणी ठरू शकली असती. तथापि, श्रेयस लवकरच बरा होऊन सामन्यात पुनरागमन करेल,'' असे पीटीआयने म्हटले आहे.
३० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यर सहभागी होऊ शकेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तो मालिकेतून बाहेर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाज ॲलेक्स कॅरीला बाद करण्यासाठी मागे धावून झेल घेताना श्रेयसला दुखापत झाली. श्रेयस घसरून पडला आणि त्याच्या बरगडीला दुखापत झाली. त्यामुळे श्रेयस अय्यरने तात्काळ मैदान सोडले होते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेपूर्वी रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून शुभमन गिलला कर्णधार बनवण्यात आले होते. तर श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आले होते. पहिल्या एकदिवसीय सामन्यात अपयशी ठरलेल्या श्रेयस अय्यरने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आकर्षक अर्धशतक झळकावले होते. असे असूनही, भारतीय संघाने पहिले दोन सामने गमावून मालिका गमावली होती.
मात्र, तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात रोहित शर्माचे आकर्षक शतक आणि विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने ९ गडी राखून सहज विजय नोंदवला. या विजयासह भारताने एकदिवसीय मालिकेतील आपला प्रवास विजयाने संपवला.