
भारतीय क्रिकेटमध्ये अनेकदा असं होतं की, टॅलेंट असूनही खेळाडूंना योग्य संधी मिळत नाही आणि त्यांना बाहेर बसावं लागतं. याच यादीतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे डावखुरा फिरकीपटू साई किशोर.
आयपीएलमध्ये शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स संघात असूनही, साई किशोरला अनेक सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. पण आता याच खेळाडूने इंग्लंडच्या मैदानावर आपल्या गोलंदाजीने दहशत निर्माण केली आहे. कौंटी क्रिकेटमध्ये विरोधी संघाच्या फलंदाजांना नाचवताना साई किशोरने फक्त २० धावांत ५ विकेट्स घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सध्या इंग्लंडमध्ये कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन २ चे सामने सुरू आहेत. यात ग्लॉस्टरशायर संघाकडून खेळताना साई किशोरने डर्बीशायर संघाचा दुसरा डाव अक्षरशः गुंडाळला. ३१९ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या डर्बीशायर संघाला साई किशोरच्या फिरकीचा सामना करताच आला नाही.
जादुई स्पेल
साई किशोरने आपल्या जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर 'W,W,W,W,W' अशा एकामागोमाग एक विकेट्स घेतल्या. त्याने फक्त २० धावा देत ५ महत्त्वाचे बळी मिळवले. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे डर्बीशायरचा संघ १०५ धावांवर ऑल आऊट झाला. यामुळे ग्लॉस्टरशायर संघाने २१३ धावांनी मोठा विजय नोंदवला.
सामन्याचा हिरो
या सामन्याच्या पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेणाऱ्या साई किशोरने एकूण ७९ धावांत ७ विकेट्स नावावर केल्या. साई किशोरची ही दमदार कामगिरी म्हणजे भारतीय निवड समिती आणि कर्णधार गिलला दिलेला एक संदेशच मानला जात आहे.
२०२३-२४ च्या रणजी ट्रॉफी हंगामात तामिळनाडू संघाकडून खेळताना साई किशोरने ५३ विकेट्स घेऊन आपण कसोटी क्रिकेटसाठी तयार असल्याचं सिद्ध केलं होतं. आयपीएलमध्येही शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सकडून मिळालेल्या संधीचं त्याने सोनं केलं. त्याने आतापर्यंत २८ आयपीएल सामन्यांमध्ये ३३ विकेट्स घेतल्या आहेत. तरीही, त्याला भारतीय संघात सातत्याने संधी मिळालेली नाही.
इंग्लंडमध्ये चमकणारे इतर भारतीय खेळाडू
सध्या कौंटी क्रिकेटमध्ये साई किशोरशिवाय इतरही अनेक भारतीय खेळाडू खेळत आहेत. युझवेंद्र चहल, मानव सुथार, कुलदीप यादव, अकिब नबी, राहुल चहर, जयदेव उनाडकट आणि मयंक अग्रवाल यांसारखे खेळाडू इंग्लंडच्या मैदानावर चांगली कामगिरी करत आहेत.
नॉर्थम्प्टनशायर संघाकडून खेळणाऱ्या चहलने एका सामन्यात दुसऱ्या डावात ५ विकेट्ससह एकूण ९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचप्रमाणे, डरहॅम संघाकडून खेळणाऱ्या कर्नाटकच्या मयंक अग्रवालने एका सामन्यात ३६ आणि ४८ धावा करून आपल्या संघाच्या १५३ धावांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. स्थानिक स्पर्धा आणि कौंटी क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट्स घेणारा साई किशोर लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेल, अशी अपेक्षा आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.