
मुंबई - भारतीय क्रिकेटचे दिग्गज कर्णधार सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा मुंबईतील नामांकित उद्योगपती रवी घाटींची नात सानिया चांधोक हिच्याशी साखरपुडा झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, तेंडुलकर किंवा घाटी कुटुंबीयांकडून याची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
इंडिया टुडेच्या माहितीनुसार, हा सोहळा अगदी खासगी पद्धतीने, फक्त जवळच्या नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत झाला. २५ वर्षीय अर्जुन हा डावखुरा जलदगती गोलंदाज आणि सर्वांगीण खेळाडू असून सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करतो. त्याने IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघासाठीही खेळले आहे.
सानिया चांधोक मुंबईतील प्रतिष्ठित व्यावसायिक घराण्यातील असून ती प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करते. ती मुंबईस्थित Mr. Paws Pet Spa & Store LLP ची डायरेक्टर आणि डिझिग्नेटेड पार्टनर आहे. घाटी कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. त्यांच्या मालकीचे InterContinental Hotel आणि Brooklyn Creamery ही लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँड आहे. साखरपुडा समारंभ हा उत्साही आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला.
अर्जुन तेंडुलकर आपला क्रिकेट कारकिर्दीचा प्रवास सातत्याने घडवत आहे. सध्या तो गोव्याच्या संघात खेळतो आणि IPL 2025 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचाही भाग होता. त्याने २०२०-२१ हंगामात मुंबईकडून हरियाणाविरुद्ध T20 सामन्यात पदार्पण केले. त्याआधी तो मुंबईच्या ज्युनियर संघात आणि भारत U19 संघातही खेळला होता.
अधिक संधी मिळवण्यासाठी तो २०२२-२३ हंगामात गोव्याकडे वळला, जिथे त्याने प्रथम श्रेणी आणि लिस्ट A क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आत्तापर्यंत त्याने १७ प्रथम श्रेणी सामने खेळून ५३२ धावा (१ शतक, २ अर्धशतकांसह) आणि ३७ बळी घेतले आहेत. त्यात एकदा ५ बळी आणि दोनदा ४ बळींची कामगिरी केली आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने गोव्याकरिता १७ सामने खेळून ९ डावांत ७६ धावा केल्या आहेत.