India Vs West Indies 2026: रोहित-विराटची वनडेत एन्ट्री, ६ दिग्गजांना डच्चू; आगरकरांचा मोठा निर्णय!

vivek panmand   | CMS
Published : Sep 18, 2026, 08:51 PM IST
cricket

सार

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने वनडे संघात कमबॅक केलंय. आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

१६ सप्टेंबर २०२६ रोजी भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात सर्वात जास्त चर्चा रोहित शर्मा आणि विराट कोहलीची होती. दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर या दोघांनीही भारताच्या वनडे संघात कमबॅक केलंय. शुभमन गिलकडे वनडेचं कर्णधारपद कायम असून के. एल. राहुल उपकर्णधार असणार आहे.

वनडे संघात ऋतुराज गायकवाड, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, नमन धीर आणि आकिब नबी यांना पहिल्यांदाच वनडे संघात संधी मिळाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या वनडेत रोहित शर्माने १३७ धावांची खेळी केली होती, तरीही त्याच्या भविष्याबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या.

आता वेस्ट इंडिज मालिकेसाठी त्याची निवड झाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळालाय. विराट कोहलीही वनडे संघात परतल्याने, हे दोघे २०२७ च्या वनडे वर्ल्डकपच्या प्लॅनिंगचा भाग असतील का, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

यावेळी वनडे संघातून ६ प्रमुख खेळाडू गायब आहेत. हे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games) निवडलेल्या संघात असल्याने त्यांना या मालिकेतून डच्चू मिळालाय. श्रेयस अय्यर, इशान किशन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह हे खेळाडू वेस्ट इंडिज वनडे मालिकेऐवजी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळताना दिसतील.

सुरुवातीला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात असलेल्या नितीश कुमार रेड्डीला आता वेस्ट इंडिज वनडे मालिकेसाठी संघात घेण्यात आलंय. टी-२० संघाचा विचार केल्यास, श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं असून तिलक वर्मा उपकर्णधार असणार आहे.

टी-२० संघात अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव आणि मयंक यादव यांचा समावेश आहे. आधीच्या संभाव्य टी-२० संघात जसप्रीत बुमराहचं नाव होतं, पण अंतिम यादीत त्याच्या जागी मयंक यादवला संधी मिळाली आहे.

याशिवाय, हर्षित राणा टी-२० संघात नाही. दुखापतीमुळे तो आधीच अफगाणिस्तान टी-२० मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर पडला होता. दुसरीकडे, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळही सध्या चर्चेचा विषय ठरलाय. त्यांचा सध्याचा करार ४ ऑक्टोबर २०२६ रोजी संपत असून, त्यांना एका वर्षाची मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

३ सप्टेंबर रोजी झालेल्या बीसीसीआयच्या (BCCI) आढावा बैठकीला आगरकर उपस्थित नव्हते, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यांच्या मुदतवाढीबाबत अद्याप अधिकृत निर्णय झालेला नसला तरी, त्यांच्याच समितीने वेस्ट इंडिज मालिकेसाठी संघाची निवड केली आहे. भारत-वेस्ट इंडिज वनडे मालिका २७ सप्टेंबर रोजी तिरुवनंतपुरम येथे सुरू होणार आहे.

दुसरा सामना ३० सप्टेंबरला गुवाहाटीत, तर तिसरा सामना ३ ऑक्टोबरला न्यू चंदीगडमध्ये खेळवला जाईल. त्यानंतर ६ ऑक्टोबरपासून पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होईल. हे टी-२० सामने अनुक्रमे ६, ९, ११, १४ आणि १७ ऑक्टोबर रोजी लखनौ, रांची, इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरू येथे खेळवले जातील. बीसीसीआयने जाहीर केलेल्या २०२६-२७ च्या देशांतर्गत वेळापत्रकातही वेस्ट इंडिज मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

BCCI AGM: बीसीसीआयच्या बैठकीत मोठे निर्णय, धुमाळ आणि मजुमदार आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलमध्ये
Abhishek Sharma: हॉटेलमध्ये अभिषेक शर्माच्या मागे धावली महिला फॅन, व्हिडिओ व्हायरल