
इंडिया ए आणि नेपाळ यांच्यात रायझिंग स्टार्स आशिया कपच्या पहिल्याच सामन्यात भारताने धडाकेबाज विजय मिळवला आहे. कतारच्या दोहामध्ये शुक्रवारी झालेल्या या सामन्यात नेपाळला अवघ्या 26 धावांवर रोखत तिलक वर्मा-वैभव सूर्यवंशी यांच्या संघाने रेकॉर्ड विजय मिळवला. 332 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला नेपाळचा संघ फक्त 11.3 षटकांत गारद झाला. प्रथम फलंदाजी करताना इंडिया ए संघाने 50 षटकांत 9 विकेट्स गमावून 332 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात संदीप लामिछानेच्या नेतृत्वाखाली खेळणारा नेपाळचा संघ केवळ 69 चेंडूंमध्ये 26 धावांवर ऑल आऊट झाला. इंडिया ए संघाने हा सामना 306 धावांच्या रेकॉर्ड फरकाने जिंकला.
नेपाळच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. पाच फलंदाज तर शून्यावरच तंबूत परतले. सर्वाधिक धावा पवन सर्राफ (6) आणि रशीद खान (6) यांनी केल्या. नेपाळने 1 धावेवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर 17 धावांवर 5 विकेट्स आणि 17 धावांवरच 8 विकेट्स अशी त्यांची अवस्था झाली.
इंडिया ए कडून गोलंदाजी करताना वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने 6 धावा देत 5 बळी घेतले, तर हर्षित राणाने 16 धावा खर्च करत 4 विकेट्स मिळवल्या. शाहबाज अहमदने एकही धाव न देता 1 बळी घेतला. तत्पूर्वी, फलंदाजीला उतरलेल्या इंडिया ए कडून कर्णधार तिलक वर्मा (113 चेंडूत 107 धावा) आणि यष्टिरक्षक कुमार कुशाग्रा (102 चेंडूत 117 धावा) यांनी दमदार शतके झळकावली. वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत 26 धावा केल्या. शेवटी सुर्यांश शडजेने 14 चेंडूत नाबाद 36 धावांची खेळी केली. मात्र अभिषेक शर्मा (9), आयुष बडोनी (2), आणि रिंकू सिंग (9) यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एक वेळ इंडिया ए संघाने 42 धावांवर 3 विकेट्स गमावल्याने त्यांच्यावर दडपण आले होते. पण चौथ्या विकेटसाठी तिलक आणि कुशाग्रा यांनी 193 चेंडूत 206 धावांची भागीदारी केली. नेपाळने आपला पूर्ण ताकदीचा राष्ट्रीय संघ उतरवूनही ते इंडिया ए संघाला अजिबात आव्हान देऊ शकले नाहीत.
इंडिया ए संघाचा पुढचा सामना रविवारी पाकिस्तान ए विरुद्ध होणार आहे. या चार संघांच्या गटातील तिलक वर्माचा शेवटचा सामना मंगळवारी यूएई (संयुक्त अरब अमिराती) विरुद्ध असेल.
आठ संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा
पुढील वर्षीच्या वनडे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर यंदा आठ संघांना घेऊन रायझिंग स्टार्स आशिया कप आयोजित करण्यात आला आहे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या पाच कसोटी खेळणाऱ्या देशांचे 'ए' संघ या स्पर्धेत भाग घेत आहेत. नेपाळ, यूएई आणि हाँगकाँग यांचे मुख्य राष्ट्रीय संघ खेळत आहेत. अ गटात बांगलादेश-ए, श्रीलंका-ए, अफगाणिस्तान-ए आणि हाँगकाँग आहेत, तर ब गटात भारत-ए, पाकिस्तान-ए, नेपाळ आणि यूएई आहेत. प्रत्येक गटातील दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. 26 आणि 27 नोव्हेंबरला दोन उपांत्य सामने होतील आणि 29 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवला जाईल. काही दिवसांपूर्वीच भारतीय अंडर-19 संघाने पाकिस्तानचा पराभव करून आशिया कपचे विजेतेपद पटकावले होते.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.