
चेन्नई: भारताचे माजी कर्णधार आणि मुख्य निवडकर्ते कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी भारतीय टी-२० टीम मॅनेजमेंट आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सततच्या प्रयोगांवर जोरदार टीका केली आहे. श्रीकांत यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, खेळाडूंना सतत बदलण्याच्या या पद्धतीमुळे युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी आणि संजू सॅमसन यांचा आत्मविश्वास खचला आहे.
भारताकडे टॉप ऑर्डरमध्ये अनेक टॅलेंटेड खेळाडू आहेत. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन हे सगळे आयपीएलमध्ये आपापल्या टीमचे मुख्य ओपनर आहेत. पण यात अभिषेक शर्माला सतत संधी दिली जातेय, तर संजू आणि वैभव सूर्यवंशीला टीममध्ये योग्य जागा न देता बाहेर ठेवलं जातंय. श्रीकांत यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना सांगितलं की, याचा खेळाडूंच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होतो. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील खराब कामगिरीनंतर वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली होती. त्यानंतर झिम्बाब्वे दौऱ्यात वैभवने ५०, २० आणि ८१ अशा उत्तम खेळी केल्या. पण तरीही मॅनेजमेंटने त्याला टीममध्ये सातत्याने संधी दिली नाही.
श्रीकांत म्हणाले, "त्यांनी फक्त संजू सॅमसनच नाही, तर वैभव सूर्यवंशीचाही आत्मविश्वास पूर्णपणे संपवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत वैभवला किमान तीन सामन्यांत तरी खेळायला द्यायला हवं होतं. अभिषेक शर्माला इतक्या सामन्यांमध्ये खेळवलंय, तर त्याला थोडी विश्रांती देऊन पुढच्या सामन्यात वैभव आणि संजूला ओपनिंगला पाठवता आलं असतं."
श्रीकांत यांनी संजू सॅमसनच्या कामगिरीतील सातत्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कप फायनलसारख्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये संजूने जबरदस्त कामगिरी केली असली, तरी त्यानंतर त्याला तोच फॉर्म टिकवता आलेला नाही. संजू वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करतो, पण लगेच पुढच्या सामन्यांमध्ये फ्लॉप ठरतो. श्रीकांत यांनी शेवटी सांगितलं की, अभिषेक शर्माच्या बाबतीत असं होत नाही, तो अधिक सातत्यपूर्ण खेळतो.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.