
मुंबई: भारतीय अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या वनडे करिअरबाबत माजी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि अभिषेक नायर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या वनडे सीरिजमधून ३७ वर्षीय जडेजाला वगळण्यात आलं असून, त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी मिळाली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपला फक्त एक वर्ष उरलं असताना, जडेजाला सतत बाहेर ठेवणं हे त्याच्या वनडे करिअरच्या शेवटाचे संकेत असू शकतात, असं पुजारा म्हणाला. तर दुसरीकडे, जडेजा टीममध्ये कायम राहील, असा विश्वास अभिषेक नायरने व्यक्त केला आहे.
चेतेश्वर पुजारा म्हणाला, "जर टीम मॅनेजमेंटला रवींद्र जडेजाला वनडेमध्ये ठेवायचं असतं, तर त्यांनी नक्कीच त्याला या सीरिजमध्ये घेतलं असतं. सध्या मुख्य अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षर पटेलला जास्त संधी दिल्या जात आहेत. जडेजाचं वय पाहता, त्याने आता फक्त टेस्ट क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावं आणि व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये त्याचा विचार केला जाणार नाही, हे मॅनेजमेंटने त्याला स्पष्ट सांगितलं असावं. त्याने टी-२० मधून आधीच निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे आता वनडेचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद झाले असावेत."
अभिषेक नायरने वेगळा मुद्दा मांडला. तो म्हणाला, "जडेजा मुख्य टीममध्ये नसला तरी, जर अक्षर पटेलला दुखापत झाली, तर मॅनेजमेंटच्या डोक्यात सर्वात आधी जडेजाचंच नाव येईल. कारण अक्षरनंतर आपल्याकडे तितका अनुभवी दुसरा खेळाडू नाही. सध्या अक्षर पटेल पहिल्या पसंतीचा खेळाडू आहे आणि जडेजा एक महत्त्वाचा बॅकअप म्हणून टीममध्ये राहील."
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील महत्त्वाची वनडे सीरिज ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पुढच्या वर्षी दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने योग्य टीम कॉम्बिनेशन शोधण्यासाठी भारतासाठी ही सीरिज खूप महत्त्वाची ठरणार आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.