
कोलकाता: आयपीएलच्या या सीजनमध्ये अंपायरच्या चुकांचं सत्र काही थांबायचं नाव घेत नाहीये. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यातल्या मॅचमध्ये थर्ड अंपायरने दिलेल्या एका निर्णयामुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. कोलकाताचा ओपनर फिन ऍलन या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला.
ही घटना मॅचच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये घडली. प्रिन्स यादवच्या बॉलवर फिन ऍलनने थर्ड मॅनच्या दिशेने एक उंच फटका मारला. बाऊंड्री लाईनवर फिल्डिंग करणाऱ्या दिग्वेश राठीने तो कॅच पकडला, पण कॅच घेताना त्याचा डावा पाय बाऊंड्री लाईनला स्पर्श करत असल्याचं रिप्लेमध्ये स्पष्ट दिसत होतं. असं असूनही, थर्ड अंपायर के. एन. अनंतपद्मनाभन यांनी रिप्ले नीट न तपासताच ऍलनला आऊट दिलं.
रिप्लेमध्ये राठीचा पाय बाऊंड्रीला लागल्याचं स्पष्ट दिसत असतानाही, थर्ड अंपायरने हा निर्णय घेण्यासाठी खूप कमी वेळ घेतला. या प्रकारामुळे चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञ चांगलेच संतापले आहेत. व्हिडिओ पाहा...
या सीजनमध्ये अंपायरिंगवरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाही. स्पर्धेच्या पहिल्याच मॅचमध्ये हेनरिक क्लासेनला आऊट करण्यासाठी फिल सॉल्टने घेतलेला कॅचही असाच वादग्रस्त ठरला होता. त्यावेळीही रिप्ले पूर्णपणे न तपासता फिल्डिंग टीमच्या बाजूने निर्णय देण्यात आला होता. सोशल मीडियावर चाहते टीका करत आहेत की, 'वाइड बॉल तपासण्यासाठी अंपायर १५ मिनिटं घेतात, पण मॅचचं चित्र बदलणाऱ्या महत्त्वाच्या विकेटच्या बाबतीत इतकी घाई का करतात?'
आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धेत, जिथे प्रत्येक रन आणि प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा असतो, तिथे अशा चुकांमुळे खेळाच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.