
IPL 2026 Auction : आयपीएल 2026 साठी मिनी ऑक्शन आज (16 डिसेंबर) अबू धाबीमध्ये होणार आहे. एकूण 350 खेळाडूंचा या लिलावामध्ये समावेश आहे. सर्व दहा फ्रेंचाइजी किती बोली लावतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याशिवाय कॅमरुन ग्रीन, वेंकटेश अय्यर, लियाम लिविंगस्टोनसारख्या खेळाडूंवर किती बोली लागते हे सर्वांसाठी उत्सुकतेचे आहे. तीन वेळेस चॅम्पियन ठरलेली कोलकाता नाइट राइडर्स 64.3 कोटी रुपयांसह लिलावात उतरण्याची शक्यता आहे. आयपीएलसाठीच्या मोठ्या ऑक्शनपूर्वी मिनी ऑक्शनबद्दलचे संपूर्ण वेळापत्रक आणि अन्य महत्वाच्या गोष्टी येथे जाणून घ्या.
आयपीएल 2026 साठी मिनी ऑक्शन 16 डिसेंबरला होणार आहे. हे ऑक्शन भारतीय वेळेनुसार, दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी सुरू होणार आहे. ऑक्शनचे ठिकाण अबू धाबीमधील एतिहाद स्टेडियम ठरवण्यात आले आहे. याशिवाय 10 संघांमध्ये एकूण 237.55 कोटींच्या पर्ससह 77 स्लॉट भरायचे आहेत.
स्टार स्पोर्ट्सद्वारे आयोजित करण्यात आलेल्या मॉक ऑक्शनमध्ये कॅमरुन ग्रीनवर 30.50 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. जर आज देखील असेच झाले तर ग्रीन आयपीएलमधील सर्वाधिक महागडा खेळाडू ठरेल. चेन्नई सुपर किंग्सजवळ 43.30 कोटी रुपये शिल्लक असून कोलकाता नाइट राइडर्सकडे 64.30 कोटी रुपये आहेत. कॅमरुन ग्रीन असा खेळाडू आहे जो चेन्नई आणि कोलकाता या दोन्ही संघाची गरज पूर्ण करू शकतो. यामुळे त्याच्यावरील बोली 30 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.