
गुवाहाटी: वेस्ट इंडिजने दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारतासमोर विजयासाठी ४०६ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलंय. विंडीजने अमीर जांगू (११४), जॉन कॅम्पबेल (१०१) आणि शाई होप (१०४) यांच्या दमदार शतकांच्या जोरावर हा मोठा स्कोर उभा केला. वेस्ट इंडिजने वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ४०० धावांचा टप्पा ओलांडलाय. पाहुण्या टीमने या इनिंगमध्ये ७ विकेट्स गमावल्या. कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि गुरनूर ब्रार यांनी भारताकडून प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. भारत सध्या तीन मॅचच्या या सिरीजमध्ये १-० ने आघाडीवर आहे.
विंडीजचा ओपनर केसी कार्टी (९) मॅचच्या सुरुवातीलाच आऊट झाला. तो दुखापतग्रस्त जस्टिन ग्रीव्हजच्या जागी ओपनिंगला आला होता. नमन धीरने प्रसिद्ध कृष्णाच्या बॉलवर त्याचा कॅच पकडला. कॅम्पबेल आणि होप या जोडीने त्यानंतर ११० धावांची पार्टनरशिप केली. कॅम्पबेलने याच दरम्यान आपलं शतक पूर्ण केलं. त्याने फक्त ६८ बॉलमध्ये ५ सिक्स आणि ९ फोर मारत १०१ धावा कुटल्या.
जांगूनेही त्यानंतर येऊन जबाबदारीने बॅटिंग केली. त्याने कॅप्टन होपसोबत मिळून १८२ धावांची पार्टनरशिप केली. ही जोडी ४० व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फुटली. आकिब नबीने कुलदीप यादवच्या बॉलवर होपचा कॅच पकडला. होपने ९४ बॉलमध्ये ३ सिक्स आणि ८ फोरच्या मदतीने १०४ धावा केल्या. विंडीजच्या रनरेटला यानंतर मात्र थोडा ब्रेक लागला. शेरफेन रदरफोर्ड (०) पहिल्याच बॉलवर आऊट झाला. ब्रारने त्याची विकेट काढली.
शतक पूर्ण करणारा जांगू दरम्यान ४३ व्या ओव्हरमध्ये आऊट झाला. ऋतुराज गायकवाडने जडेजाच्या बॉलवर त्याचा कॅच घेतला. किमो पॉल (३) आणि अल्झारी जोसेफ (८) यांना फार काही करता आलं नाही. रोस्टन चेसलाही (२५ बॉलमध्ये २९) शेवटच्या ओव्हर्समध्ये मोठे शॉट्स मारता आले नाहीत. शमार जोसेफ (८ बॉलमध्ये १४) चेससोबत नॉट आऊट राहिला. ब्रारने बॉलिंगमध्ये १० ओव्हरमध्ये ९६ धावा दिल्या. जडेजाने ७५ तर कुलदीपने ६५ धावा खर्च केल्या. डेब्यू करणाऱ्या आकिब नबीने ८.५ ओव्हरमध्ये ८४ धावा दिल्या.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.