
India vs New Zealand ODI Series 2026 Predicted Squad : भारतीय क्रिकेट संघ 2026 या वर्षाची सुरुवात न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसह करत आहे. किवी संघ यावेळी पाहुणा म्हणून भारत दौऱ्यावर येत आहे. ३ वनडे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची जोडी पुन्हा एकदा निळ्या जर्सीत दिसणार आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. तर, न्यूझीलंडने दोन्ही फॉरमॅटसाठी आपला संघ निवडला आहे. आता भारतीय चाहते एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.
टीम इंडियाचे २ दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. दोघांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हिटमॅनने शेवटच्या वनडेमध्ये शानदार शतक झळकावले होते. त्याआधी २ सामन्यांमध्ये त्याने अर्धशतकी खेळी केली होती. नुकत्याच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेतही त्याने चांगली फलंदाजी केली आहे. तर, विराटही तुफान फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियात लय सापडल्यानंतर तो सातत्याने धावा करत आहे. आफ्रिकेविरुद्ध त्याने सलग २ शतके झळकावली आहेत. विराट आणि रोहितने विजय हजारे ट्रॉफीमध्येही शतक लगावले. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धही या दोघांवर सर्वांच्या नजरा असतील.
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघ निवडणे हे निवड समितीसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. विशेषतः श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतून बाहेर होते. जसप्रीत बुमराहही संघात परतणार आहे. दुखापतीमुळे दोघेही खेळत नव्हते. त्यामुळे ते न्यूझीलंडविरुद्ध पुनरागमन करण्यास तयार आहेत. आता या दोघांच्या पुनरागमनामुळे ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा यांचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते. या तिघांनाही बाहेर ठेवले जाऊ शकते. मात्र, ऋतुराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या वनडेमध्ये शतक झळकावले होते.
टीम इंडियाचा संभाव्य १५ सदस्यीय संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.