
नवी दिल्ली- भारताने अलीकडेच पाकिस्तानसोबतच्या क्रीडा संबंधांबाबत आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली आहे. गुरुवारी जाहीर केलेल्या नव्या धोरणानुसार भारताने द्विपक्षीय स्पर्धा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात आता थेट मालिका किंवा सामने होणार नाहीत. मात्र, आशिया कप किंवा वर्ल्ड कपसारख्या बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध खेळू शकतील. या निर्णयामुळे भारताने आपल्या सुरक्षा व राजकीय दृष्टीकोनातून घेतलेल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे.
क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयाने जाहीर केले आहे की भारतीय खेळाडू पाकिस्तानसोबत कोणतेही द्विपक्षीय सामने खेळणार नाहीत. हे सामने भारतात असोत किंवा पाकिस्तानात, दोन्हीकडे बंदी असेल.
मंत्रालयाच्या धोरणात म्हटले आहे की, “पाकिस्तानशी संबंधित क्रीडा स्पर्धांबाबत भारताची भूमिका हा त्या देशाशी असलेल्या एकूण धोरणाचा भाग आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानात सामने खेळणार नाहीत आणि पाकिस्तानी संघांनाही भारतात येऊन खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही.”
या निर्णयामुळे भारत-पाकिस्तान यांच्यात थेट क्रीडा सामने लवकरच पुन्हा सुरू होतील अशी चाहत्यांची आणि क्रीडा जगतातील अपेक्षा आता संपुष्टात आली आहे.
भारताने स्पष्ट केले आहे की आंतरराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मात्र भारतीय खेळाडूंचा सहभाग सुरू राहील. याचा अर्थ असा की पुढील महिन्यातील आशिया कप स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ खेळेल, जिथे पाकिस्तानचाही सहभाग असेल.
मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले की, “आशिया कपसारख्या बहुपक्षीय स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ खेळेल, कारण ती आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. मात्र द्विपक्षीय सामने भारतात होऊ देणार नाही आणि पाकिस्तानालाही परवानगी देणार नाही. पण बहुपक्षीय सामने रोखले जाणार नाहीत, कारण आम्ही ऑलिंपिक चार्टरचे पालन करतो.”
भारताने म्हटले आहे की पाकिस्तानविरुद्ध द्विपक्षीय सामने होणार नाहीत. मात्र आंतरराष्ट्रीय किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू सहभागी होतील. पाकिस्तानचे खेळाडू भारताने आयोजित केलेल्या अशा बहुपक्षीय स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतील. भारत आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा यजमान देश म्हणून अधिक सक्षम व्हावा यासाठी खेळाडू, अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ केली जाईल. आंतरराष्ट्रीय संस्थांचे वरिष्ठ अधिकारी भारतात आले तर त्यांना योग्य प्रोटोकॉल आणि आदर सन्मान दिला जाईल.