
India Clinches Test Series 2 0 Against West Indies : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताने सात विकेट्स राखून शानदार विजय मिळवत दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. ५८ धावांवर नाबाद राहिलेल्या केएल राहुलने भारताचा विजय सोपा केला. ध्रुव जुरेल सहा धावांवर राहुलसोबत नाबाद राहिला. शेवटच्या दिवशी भारताने साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्या विकेट्स गमावल्या. कर्णधार झाल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकलेली ही पहिलीच कसोटी मालिका आहे. स्कोअर: भारत ५१८-५, १२४-३, वेस्ट इंडिज २४८, ३९०.
१२१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, भारतीय संघ शेवटच्या दिवशी ६३ धावांवर एक गडी बाद अशा स्थितीत मैदानात उतरला. विजयासाठी भारताला आणखी ५८ धावांची गरज होती. धावसंख्या ८८ असताना, रोस्टन चेसच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये शाय होपने साई सुदर्शनचा अप्रतिम झेल घेतला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार शुभमन गिलने एक चौकार आणि एक षटकार मारून सुरुवात केली, पण १५ चेंडूंत १३ धावा काढून तो जस्टिन ग्रीव्हजच्या गोलंदाजीवर रोस्टन चेसला झेल देऊन बाद झाला. त्यानंतर आलेल्या ध्रुव जुरेलच्या साथीने राहुलने भारताला विजयाची रेषा ओलांडून दिली.
काल दोन गडी बाद १७३ अशा स्थितीतून वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला. जॉन कॅम्पबेल आणि शाय होप यांच्या शतकांच्या जोरावर विंडीजने डावातील पराभव टाळला. कॅम्पबेल आणि शाय होप यांनी तिसऱ्या विकेटसाठी १७७ धावांची भागीदारी केली. दोघे बाद झाल्यानंतर विंडीजची फलंदाजी ढेपाळली. २७१-३ वरून विंडीजचा संघ ३११-९ असा कोसळला. त्यानंतर ग्रीव्हज-सील्स जोडीने दहाव्या विकेटसाठी ७९ धावांची भर घालून विंडीजला ३९० धावांपर्यंत पोहोचवले. सील्सला बाद करून बुमराहने विंडीजचा प्रतिकार संपवला. ग्रीव्हज ५० धावांवर नाबाद राहिला, तर सील्सने ३२ धावा केल्या.