
India A vs Pakistan A Catch Controversy : रायझिंग एशिया कप 2025 मध्ये पाकिस्तान ए संघाने भारत ए संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 136 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 13.02 षटकांतच लक्ष्य गाठले, ज्यात माज सदाकतने 47 चेंडूत 79 धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. पण, या सामन्यात बराच ड्रामाही पाहायला मिळाला. सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार जितेश शर्मा, वैभव सूर्यवंशी आणि अनेक खेळाडू पंचांशी वाद घालू लागले, चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण...
भारत ए विरुद्ध पाकिस्तान ए दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी20 सामन्यात, पाकिस्तानच्या डावातील दहाव्या षटकात फिरकीपटू सुयश शर्माच्या चेंडूवर फलंदाज सदाकतने एक शॉट खेळला, पण बाऊंड्री लाईनवर नेहाल वढेराने त्याचा कॅच पकडला. एका क्षणी वाटले की चेंडू सीमारेषेपार जाईल आणि षटकार होईल, पण वढेराने चेंडू सीमारेषेच्या आत फेकला आणि नंतर तोल सांभाळून पुन्हा चेंडू पकडला. टीम इंडियाचे खेळाडू जल्लोष करू लागले, पण त्यानंतर जे घडले त्यामुळे खेळाडू चांगलेच संतापले.
सदाकतच्या कॅचनंतर ऑन-फिल्ड पंचांनी कॅच तपासण्यासाठी तो तिसऱ्या पंचांकडे सोपवला. रिप्लेमध्येही तो आऊट असल्याचे दिसत होते, पण तिसरे पंच मोर्शेद अली खान यांनी फलंदाजाला नॉट आऊट दिले, जे पाहून केवळ खेळाडूच नाही तर स्टेडियममध्ये उपस्थित असलेले चाहतेही आश्चर्यचकित झाले. खुद्द पाकिस्तानी फलंदाजही मैदान सोडून डगआऊटमध्ये जात होता, पण हा निर्णय अत्यंत धक्कादायक होता. तिसऱ्या पंचांच्या या निर्णयावर भारतीय खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आणि काही काळ खेळही थांबला. सोशल मीडियावर या वादाचे फोटो आणि व्हिडिओही व्हायरल होत आहेत, ज्यात कर्णधार जितेश शर्मा, वैभव सूर्यवंशी यांच्यासह इतर खेळाडू पंचांवर राग व्यक्त करताना दिसत आहेत.
भारत ए आणि पाकिस्तान ए यांच्यात खेळल्या गेलेल्या रायझिंग एशिया कप 2025 टी20 सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 139 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने 45 धावा आणि नमन धीरने 35 धावांची खेळी केली, पण या दोघांशिवाय इतर कोणताही फलंदाज जास्त धावा करू शकला नाही. दुसरीकडे, पाकिस्तानचा सलामीवीर माज सदाकतने 79 धावांची खेळी केली आणि 2 विकेट्सही घेतल्या, ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. 2025 मध्ये पाकिस्तान संघाने भारताला हरवण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी दोन्ही संघांमध्ये वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये 6 सामने झाले, ज्यात पाच वेळा भारताने विजय मिळवला आहे.