
वय फक्त एक आकडा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. इम्रान ताहिरचे सगळे जुने साथीदार निवृत्त झाले, पण हा ४७ वर्षांचा गडी अजूनही मैदान गाजवतोय. दक्षिण आफ्रिकेच्या या स्पिनरने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये (CPL) कमाल केली आहे. गयाना ॲमेझॉन वॉरियर्सकडून खेळताना त्याने सेंट लुसिया किंग्सविरुद्ध पाच विकेट्स घेतल्या.
या कामगिरीमुळे तो T20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात पाच विकेट्स घेणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. ज्यावेळी त्याने १७ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तेव्हा त्याचं वय ४७ वर्षं आणि १६७ दिवस होतं. गंमत म्हणजे, ताहिरने २०२५ मध्ये केलेला स्वतःचाच विक्रम आता मोडला आहे.
या सामन्यात सेंट लुसिया किंग्सचा संघ ११९ धावांवर ऑल आऊट झाला, तर ॲमेझॉन वॉरियर्सने १८.३ ओव्हर्समध्येच हे लक्ष्य गाठलं.
गेल्या वर्षीसुद्धा इम्रान ताहिरने कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये पाच विकेट्स घेतल्या होत्या. T20 इतिहासात वयाच्या चाळिशीनंतर चार वेळा पाच विकेट्स घेणारा तो एकमेव खेळाडू आहे. ताहिरची कहाणीही तितकीच रंजक आहे. त्याचा जन्म पाकिस्तानात झाला. तो पाकिस्तानच्या अंडर-19 आणि पाकिस्तान 'ए' संघाकडूनही खेळला, पण त्याला सिनिअर टीममध्ये संधी मिळाली नाही.
त्यानंतर तो त्याच्या प्रेयसीसाठी दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झाला. तिथे त्याने हळूहळू देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आणि अखेर दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघात जागा मिळवली. वयाच्या ३१ व्या वर्षी त्याने दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट्स घेणारा तो दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आहे. इतकंच नाही, तर एका वनडे सामन्यात ७ विकेट्स घेणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकन गोलंदाजही आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.