
दुबई: भारत-पाकिस्तान सामना म्हणजेच क्रिकेटप्रेमींसाठी मेजवानी! पण या सामन्यात जे घडलं त्याने सुरुवातीलाच पाकिस्तानच्या संघाला हादरवलं. सामना सुरू होताच हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूवर अशी कामगिरी केली की, पाकिस्तानचा सलामीवीर सैम अयुबला खेळपट्टीवर थांबायलाच संधी मिळाली नाही.
सामन्याच्या सुरुवातीलाच एक अनोखा प्रसंग घडला. टॉससाठी सूर्यकुमार यादव मैदानात आला होता. पाकिस्तानने टॉस जिंकला खरा, पण त्यानंतर सूर्याने जे केलं त्याची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. टॉसनंतर पाकिस्तानचा कर्णधार आगा सलमान सूर्याशी हस्तांदोलन करण्यासाठी पुढे आला. मात्र सूर्यानं हाताची घडी घालून सरळ निघून गेला. त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार अवाक झाला आणि हे दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं.
टॉसनंतर सामना सुरू झाला आणि हार्दिक पंड्याने पहिलं षटक टाकायला घेतलं. पाकिस्तानचा सलामीवीर सैम अयुब बुमराहला षटकार मारण्याची तयारी करत होता, पण तोवर हार्दिकने त्याचं स्वप्नच चुरगाळून टाकलं. पहिल्याच चेंडूवर सैम अयुबने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थेट भारतीय क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला आणि तो शून्यावरच बाद झाला.
हा चेंडू इतक्या वेगात आला की अयुबकडे दुसरा पर्यायच उरला नाही. परिणामी, पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला आणि त्यांची सुरुवात दणक्यात झाली.
हार्दिकच्या या अप्रतिम सुरुवतीनंतर जसप्रीत बुमराहने दुसऱ्याच षटकात पाकिस्तानला दुसरा धक्का दिला. एकामागोमाग लागलेल्या विकेट्समुळे पाकिस्तानचा डाव कोसळताना दिसला आणि भारताने सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड मिळवली.