
मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीतही टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा २८८ धावांची पहिल्या डावातील आघाडी स्वीकारल्यानंतर भारताला दुसऱ्या डावात आठ षटके गोलंदाजी करूनही दक्षिण आफ्रिकेची एकही विकेट घेता आली नाही. १० विकेट्स शिल्लक आणि ३१४ धावांची आघाडी असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा या कसोटीत पराभव होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मायदेशात सलग दुसऱ्यांदा कसोटीत व्हाईटवॉश होण्याची नामुष्की भारतावर ओढवली आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध ०-३ ने पराभूत झालेल्या भारताला, काही चमत्कार घडला नाही तर, यावेळी दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ ने पराभव पत्करावा लागेल.
पहिल्या कसोटीच्या चौथ्या डावात १२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ ९३ धावांवर सर्वबाद झाला आणि संघाला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. दुसऱ्या कसोटीत तरी संघ पुनरागमन करेल ही आशा धुळीस मिळाल्याने गौतम गंभीरला प्रशिक्षकपदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. गंभीरला हटवण्याच्या मागणीसाठी चाहते सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया देत आहेत.
मात्र, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी गमावून मालिका गमावली तरी गंभीरला तूर्तास पदावरून हटवले जाण्याची शक्यता कमी आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये टी-२० विश्वचषक होणार असल्याने, त्यानंतरच बीसीसीआय गंभीरच्या बाबतीत निर्णय घेईल, असे मानले जात आहे.