
Bangladesh Boycotts T20 World Cup in India : भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ पाठवणार नाही, असे बांगलादेशने म्हटले आहे. भारत आणि बांगलादेशमधील क्रिकेट संबंध इतिहासातील सर्वात मोठ्या संकटातून जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेल्या या वादामुळे आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनावरही परिणाम झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी रकमेला (9.2 कोटी रुपये) खरेदी केलेल्या बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळण्याचा बीसीसीआयने निर्देश दिल्याने या वादाची सुरुवात झाली. दरम्यान, हे सामने श्रीलंकेत घ्यावेत अशी मागणी बांगलादेशकडून करण्यात आली आहे.
बांगलादेशात अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ भारताकडून ही कारवाई करण्यात आल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. यामुळे बांगलादेशचे क्रिकेट चाहते आणि सरकार संतप्त झाले. यानंतर, भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमधील आपले सामने भारतातून इतरत्र हलवावेत, अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे केली. मात्र, आयसीसीने ही मागणी फेटाळून लावली. सध्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही आणि भारतात न खेळल्यास गुण गमावावे लागतील, असे आयसीसीने स्पष्ट केले.
मात्र, सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी करणारे पत्र बांगलादेश पुन्हा लिहिणार आहे. देशाचा स्वाभिमान गहाण ठेवून वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार नाही. खेळाडू, प्रेक्षक आणि पत्रकारांना भारतात सुरक्षा मिळेल, असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नसरुल यांनी दिली आहे.
मुस्तफिजुरला वगळल्याच्या निषेधार्थ बांगलादेश सरकारने आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. ५ जानेवारी रोजी याबाबतचा आदेश जारी करण्यात आला. जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.