
(Mustafizur controversy) ढाका : बांगलादेशात विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर 5 ऑगस्ट 2024 रोजी सत्तापालट होऊन अर्थतज्ज्ञ मोहम्मद युनूस यांच्या हाती कारभार सोपविला गेला. तर, अवामी लीगच्या सर्वेसर्वा शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि बांगलादेशमधून बाहेर पडत त्या थेट भारतात दाखल झाल्या. तेथील हिंसाचार कमी झाला असला तरी, अजूनही अल्पसंख्याक हिंदू समाजाला लक्ष्य केले जात आहे. त्याबद्दल भारतीयांच्या मनात संतापाची भावना आहे. याच पार्श्वभूमीवर बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएलमध्ये खेळण्यापासून वगळल्यानंतर, बांगलादेशने देशात आयपीएल सामन्यांच्या प्रक्षेपणावर बंदी घातली आहे. बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दूरचित्रवाणी वाहिन्यांना देशात आयपीएल सामने प्रसारित न करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुस्तफिजुर रहमानवरील बंदीचे कोणतेही समर्थन होऊ शकत नाही आणि बीसीसीआयने बांगलादेशच्या जनतेला दुखावणारा निर्णय घेतला आहे. या परिस्थितीत, जनतेचे हित लक्षात घेऊन देशात आयपीएल सामने प्रसारित करू नयेत, असे मंत्रालयाने आदेशात म्हटले आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत आयपीएल सामने किंवा सामन्यांशी संबंधित इतर कोणतेही कार्यक्रम प्रसारित करू नयेत असा आदेश जारी करण्यात येत आहे, असे बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यापूर्वी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकातील बांगलादेशचे सामने भारतातून इतरत्र हलवण्याची मागणी केली होती. सुरक्षेच्या कारणास्तव ही मागणी करण्यात आली होती.
बांगलादेशात अल्पसंख्याकांना लक्ष्य केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, मुस्तफिजुरला संघात घेतल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्स आणि संघाचे मालक शाहरुख खान यांच्याविरोधात निदर्शने वाढल्यानंतर बीसीसीआयने कोलकाताला मुस्तफिजुरला संघातून मुक्त करण्यास सांगितले. आयपीएलच्या मिनी लिलावात कोलकाताने मुस्तफिजुर रहमानला 9.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. मुस्तफिजुरच्या जागी बदली खेळाडू हवा असल्यास त्याला परवानगी दिली जाईल, असे बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी माध्यमांना सांगितले होते.
गेल्या महिन्यात अबू धाबी येथे झालेल्या आयपीएल मिनी लिलावात चेन्नई सुपर किंग्जचे कडवे आव्हान मोडून काढत कोलकाताने 2 कोटी रुपये मूळ किंमत असलेल्या मुस्तफिजुरला 9.2 कोटी रुपयांना संघात घेतले होते. बांगलादेशातील अंतर्गत कलहामुळे अल्पसंख्याकांवर हल्ले सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशातील विविध हिंदू संघटना आणि भाजपने मुस्तफिजुरला संघात घेतल्याबद्दल निषेध व्यक्त केला होता. मुस्तफिजुर खेळल्यास आयपीएल सामने रोखले जातील, अशी धमकी उज्जैनमधील धार्मिक नेत्यांनीही दिली होती. यानंतर बीसीसीआयने कोलकाताला मुस्तफिजुरला वगळण्याचे निर्देश दिले होते.
डिसेंबरमध्ये बांगलादेशातील मैमनसिंगमध्ये दिपू चंद्र दास नावाच्या या कापड फॅक्टरीतील कामगाराला धर्मनिंदेच्या आरोपाखाली जमावाने मारहाण करून जीवे मारले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात राजबाडी गावात अमृत मोंडल नावाच्या एका हिंदू व्यक्तीलाही जमावाने जीवे मारले होते. यानंतर बांगलादेशी वेगवान गोलंदाजाला संघात घेतल्याबद्दल कोलकाता नाईट रायडर्स आणि संघाचे मालक शाहरुख खान यांच्याविरोधात सायबर हल्ला तीव्र झाला आणि नेत्यांनी प्रक्षोभक विधाने करण्यास सुरुवात केली.