
ऑकलंड: भारतीय संघाचा ऑलराउंडर अक्षर पटेलने पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये एक भलताच मोठा पराक्रम केलाय. टी-२० फॉरमॅटमध्ये ३,००० धावा आणि ३०० विकेट्सचा टप्पा पार करणारा अक्षर हा पहिलाच भारतीय खेळाडू बनला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात फिन ॲलनला आऊट करत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी पूर्ण केली. याआधी रशीद खान, सुनील नरेन, ड्वेन ब्राव्हो, आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, शाहिद आफ्रिदी, किरॉन पोलार्ड आणि सॅम करन यांसारख्या मोजक्याच दिग्गज खेळाडूंना हा टप्पा गाठता आला होता.
अक्षरने आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत ३४५ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २१.९४ च्या सरासरीने आणि १३४.४३ च्या स्ट्राइक रेटने ३,८१-८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये ९ अर्धशतकांचा समावेश आहे. यासोबतच त्याने गोलंदाजीत ३०० विकेट्सही पूर्ण केल्या आहेत. मात्र, हा ऐतिहासिक विक्रम नोंदवला असला तरी ऑकलंडमधील हा सामना अक्षरसाठी वैयक्तिकरीत्या फारसा चांगला राहिला नाही. ३ षटकांत ४३ धावा देत त्याला अवघी १ विकेट मिळाली. १७ चेंडूंत ३१ धावा करणाऱ्या फिन ॲलनला त्याने अभिषेक शर्माकरवी झेलबाद केले.
फलंदाजीतही अक्षरला काही खास कमाल दाखवता आली नाही. तो ९ चेंडूंत ७ धावा काढून मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर त्याच झेल देऊन बाद झाला. या सामन्यात भारतीय संघाला ८७ धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ७ गडी गमावून २५९ धावांचा डोंगर उभारला होता. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने ४९ चेंडूंत १०७ धावांची तर मायकेल ब्रेसवेलने २५ चेंडूंत ६५ धावांची तुफानी खेळी केली. या दोघांनी मिळून ४१ चेंडूंत ११५ धावांची भागीदारी रचली.
धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला २० षटकांत ९ गडी गमावून १७२ धावांपर्यंतच मजल मारता आली. या पराभवामुळे मालिका ४-० किंवा ५-० ने जिंकण्याचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले असले, तरी सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकल्यामुळे ५ सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या ३-१ ने पुढे आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.