
Australia Sets 187 Run Target for India : होबार्टच्या बेलेरिव्ह ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. भारताने या मालिकेत आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर १८७ धावांचे लक्ष्य ठेवले, ज्यात टिम डेव्हिड आणि मार्कस स्टॉइनिस यांनी शानदार खेळी केली. दुसरीकडे, भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनेही आपल्या गोलंदाजीने कमाल केली. त्याला मागच्या सामन्यातून वगळण्यात आले होते, पण यावेळी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आणि त्याने या संधीचे सोने केले.
भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ६ गडी गमावून १८६ धावा केल्या. यात सर्वाधिक धावा टिम डेव्हिडने केल्या. त्याने ३८ चेंडूत ८ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७४ धावांची खेळी केली. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसनेही आपल्या बॅटने शानदार कामगिरी करत ३९ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या. कर्णधार मिचेल मार्शने ११, ट्रॅव्हिस हेडने ६, मॅट शॉर्टने नाबाद २६ आणि झेवियर बार्टलेटने नाबाद ३ धावा केल्या.
भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंगने या सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने ४ षटकांत ८.७५ च्या इकॉनॉमीने ३५ धावा देत ३ बळी घेतले. त्याने पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेडची विकेट घेतली, ज्याने ४ चेंडूत १ चौकार मारून ६ धावा केल्या होत्या. यानंतर तिसऱ्या षटकात त्याने यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिसला बाद केले, जो संघासाठी फक्त एक धाव करू शकला. त्यानंतर त्याने मार्कस स्टॉइनिसला झेलबाद करण्याचा प्रयत्न केला, पण रिंकू सिंगच्या हातून तो झेल सुटला. अखेर १९.३ षटकात त्याने मार्कस स्टॉइनिसलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, ज्याने आपल्या संघासाठी ६४ धावांची खेळी केली. अर्शदीपशिवाय वरुण चक्रवर्तीने २ आणि शिवम दुबेने १ बळी घेतला. जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि अभिषेक शर्मा यांना एकही विकेट मिळाली नाही.
भारत: शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, झेवियर बार्टलेट, सीन अँथनी ॲबॉट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन.