
AUS vs ENG Womens World Cup 2025 : महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 चा 23 वा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने स्पर्धेतील विजयाचा जोर कायम ठेवला आहे. तर, इंग्लिश संघाला पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासह कांगारू संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी पुन्हा एकदा धावसंख्येचा पाठलाग सोपा करून दाखवला आहे. सामना अवघ्या 40 षटकांतच संपवला. चला सामन्याचा संपूर्ण आढावा घेऊया.
ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. इंग्लिश फलंदाजांनी 50 षटकांत 9 गडी गमावून 244 धावा केल्या. टॅमी ब्यूमाँटने सर्वाधिक 105 चेंडूत 78 धावांची खेळी केली, ज्यात 10 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तिच्याशिवाय ॲलिस कॅप्सीने 32 चेंडूत 38 धावा, चार्ली डीनने 26, सोफिया डंकलेने 22, हेदर नाइटने 20 आणि एमी जोन्सने 18 धावांचे योगदान दिले. टॅमी वगळता एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही, त्यामुळे इंदूरसारख्या हाय-स्कोअरिंग खेळपट्टीवर धावसंख्या 250 च्या खाली राहिली.
तर, ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. संघाकडून ऍनाबेल सदरलँडने 10 षटकांत 60 धावा देत 3 बळी घेतले. तिच्याशिवाय ऍशले गार्डनर आणि सोफी मॉलिन्यूक्स यांना प्रत्येकी 2-2 यश मिळाले. फिरकी गोलंदाज एलाना किंगनेही 10 षटकांत केवळ 20 धावा देत 1 बळी घेतला. एलानाने कमी विकेट्स घेतल्या असल्या तरी तिने इंग्लंडला पूर्णपणे बांधून ठेवले.
प्रत्युत्तरात 245 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 40.3 षटकांत सामना जिंकला. ऍशले गार्डनरने गोलंदाजीनंतर फलंदाजीतही धुमाकूळ घातला. तिने 73 चेंडूत 16 चौकारांच्या मदतीने 104 धावांची खेळी केली. ऍनाबेल सदरलँडनेही अष्टपैलू कामगिरी करत 98 धावांची नाबाद खेळी केली, ज्यात 9 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश होता. तिच्याशिवाय एलिस पेरीने 13, फोबी लिचफिल्डने 1 आणि जॉर्जिया वॉलने 6 धावांचे योगदान दिले.
आतापर्यंत या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाजी करणारी इंग्लंड महिला संघाची गोलंदाजी या सामन्यात सामान्य दिसली. संघाकडून लिन्से स्मिथने 8 षटकांत 43 धावा देत 2 फलंदाजांना बाद केले. तिच्याशिवाय लॉरेन बेल आणि सोफी एक्लेस्टन यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले. इंग्लंडकडून एकही गोलंदाज एलाना किंगसारखी गोलंदाजी करू शकला नाही. त्यामुळे धावांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले.