
मुंबई : भारताचा माजी फलंदाज अजिंक्य रहाणेने जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट पाच टी-२० फलंदाजांची निवड केली आहे. विशेष म्हणजे, त्याने या यादीत भारताचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना स्थान दिलेले नाही. रहाणेने आपल्या यादीत फक्त एकाच भारतीय युवा खेळाडूला संधी दिली आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर युवा सलामीवीर अभिषेक शर्मा आहे. अभिषेकने टी-२० मध्ये सर्वात जलद १००० धावांचा टप्पा गाठला असून २०२६ च्या टी-२० विश्वचषक विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. क्रिकबझला दिलेल्या विशेष मुलाखतीत रहाणेने अभिषेकचे भरभरून कौतुक केले. गेल्या एक-दोन वर्षांत अभिषेकने दाखवलेले सातत्य, त्याची आक्रमक शैली आणि प्रगल्भता खरोखरच थक्क करणारी आहे, असं रहाणे म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. गेल्या काही हंगामात क्लासेनने आपली फलंदाजी ज्या प्रकारे सुधारली आहे आणि कठीण परिस्थितीत संघाला विजय मिळवून दिला आहे, त्यामुळे त्याला हे स्थान मिळाले आहे. गेल्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून चौथ्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना ६०० पेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला होता.
वेस्ट इंडिजचा स्फोटक डावखुरा फलंदाज निकोलस पूरन तिसऱ्या क्रमांकावर आहे. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांचा सारख्याच ताकदीने सामना करत कधीही सामन्याचे चित्र पालटण्याची क्षमता पूरनमध्ये असल्याचे रहाणेने नमूद केले. न्यूझीलंडचा सलामीवीर फिन ॲलन चौथ्या स्थानावर आहे. टी-२० मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च स्ट्राईक रेट असलेल्या ॲलनने २०२६ च्या विश्वचषकात किवी संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोठी भूमिका बजावली होती. इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार आणि सलामीवीर जोस बटलर रहाणेच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. बटलर हा इंग्लंड क्रिकेटमधील सर्वात धोकादायक व्हाईट-बॉल खेळाडूंपैकी एक असल्याचे रहाणेने म्हटले आहे.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.