
बंगळुरू: वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताला नमन धीरच्या रूपाने एक नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने या पंजाबच्या खेळाडूचं भरभरून कौतुक केलंय. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत संघात स्थान मिळवलेल्या नमनने संपूर्ण मालिकेत आपली अष्टपैलू चमक दाखवली. गोलंदाजीत १० षटकांत ५ बळी घेणाऱ्या नमनने बंगळुरूमध्ये झालेल्या शेवटच्या सामन्यात आपल्या फलंदाजीची ताकदही दाखवून दिली.
या सामन्यात नमनने अवघ्या ६ चेंडूत नाबाद २४ धावा कुटल्या. त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत डावाची सुरुवात केली. त्यानंतर आणखी एक चौकार आणि दोन षटकार मारत त्याने चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांना थक्क केलं. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना आकाश चोप्राने सांगितलं की, नमनच्या फलंदाजीच्या स्टाईलमध्ये हार्दिक पांड्याच्या खेळाची झलक पाहायला मिळते.
आकाश चोप्रा म्हणाला, 'नमनने खेळलेला पहिला चेंडूच पाहा. तो लेग साईडचा चेंडू होता, पण तरीही त्याने तो थेट गॅलरीत भिरकावून दिला, यातून त्याचा क्लास दिसून येतो. त्याच्याकडे उत्तम क्रिकेटिंग सेन्स आहे. तो आपली उंची आणि लांब हातांचा खूप चांगला वापर करतो. फलंदाजी करताना त्याच्यात हार्दिक पांड्यासारखं साधर्म्य दिसतं. तो एक चांगला बेस तयार करतो आणि शरीराचा बॅलन्सही उत्तम राखतो.'
भारतीय संघात नमन सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. या पोझिशनवर खूप कमी चेंडू खेळायला मिळतात आणि अशा वेळी संघासाठी जास्तीत जास्त धावा काढणं हे खूप कठीण काम असतं, असंही चोप्राने नमूद केलं. शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या ज्याप्रमाणे लोअर ऑर्डरमध्ये येऊन सामने फिनिश करतात, तशीच क्षमता नमनमध्येही असल्याचं चोप्राने शेवटी सांगितलं.
क्रिकेट बातम्या (Cricket News): Get the latest and in-depth cricket news in Marathi, including live updates, scores and key developments from IPL and other major cricket series, only on Asianet Marathi News.