मुंबईत पुन्हा एकदा मराठी-हिंदी वाद पेटला! तरुणाचा कॅब चालकाला भररस्त्यात चोप; व्हिडीओ व्हायरल

Published : May 17, 2025, 08:55 PM IST
crime news

सार

ऑनलाईन कॅब बुकिंगवरून सुरू झालेला वाद भाषेच्या मुद्द्यावरून मारहाणीत परावर्तित झाला. संतप्त तरुणाने कॅब चालकाला भररस्त्यात मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुंबई: राज्यात मराठी विरुद्ध हिंदी भाषेवरून सुरू असलेल्या वादांना आता आणखी एक प्रकरण जोडले गेले आहे. एका ऑनलाईन कॅब राईडवरून सुरू झालेला वाद अचानक इतका टोकाला गेला की एक तरुण संतप्त होऊन भररस्त्यात कॅब चालकाला चोप देतो आणि या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

काय घडलं नेमकं?

एक तरुणाने ऑनलाईन कॅब बुक केली होती. काही वेळाने कॅब चालक थोडा उशीराने, सुमारे पाच मिनिटांनी पोहोचला. मात्र, पोहोचताच चालकाने "मला जायचं नाही" असं सांगत राईड रद्द करण्यास सुरुवात केली. यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने विचारणा केली की, "तुला जायचं नव्हतं तर राईड स्वीकारलीच कशाला?"

यावर चालकाने उडवाउडवीची उत्तरं देत वादाला नवा रंग दिला. पाहता पाहता, प्रवासासंदर्भातील वाद भाषेच्या मुद्द्यावर पोहोचला. या वादात कडवटपणा आला आणि तरुणाने मोबाईल कॅमेरा ऑन करत चालकाला खडसावण्यास सुरुवात केली.

वाद ते मारहाण... आणि कॅब चालकाचा पळ

चालकाच्या निष्काळजी आणि अरेरावीपूर्ण वागणुकीमुळे वातावरण तापलं. तरुणाने RTI कार्यालयात तक्रार करण्याची धमकी दिल्यावरही, "तु तक्रार कर, मला काही फरक पडत नाही", असं म्हणून चालकाने वाद आणखी चिघळवला. यानंतर तरुणासोबत असलेल्या काही लोकांनी मिळून चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. हतबल झालेला चालक कॅब तशीच रस्त्यावर सोडून पळून गेला.

व्हिडीओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप

ही संपूर्ण घटना @gharkekalesh या एक्स (पूर्वीचा ट्विटर) हँडलवरून पोस्ट करण्यात आली असून, व्हिडीओ पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही लोकांनी कॅब चालकाच्या अरेरावीला दोषी ठरवले, तर काहींनी तरुणाच्या दादागिरीवर टीका केली. बहुतांशांनी दोन्ही बाजूंनी गैरप्रवृत्ती असल्याचे मत मांडले असून, "भाषेवरून वाद होणं हे दुर्दैवी आहे," असं स्पष्टपणे नमूद केलं आहे.

पोलीस गप्प, तक्रार नाही

या प्रकाराबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पोलिस तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे पोलीस यंत्रणा यावर काय कारवाई करणार हे स्पष्ट नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भांडुपमध्ये एका हिंदी भाषिक पिझ्झा डिलिव्हरी बॉयला पैसे न दिल्याची घटना समोर आली होती, ज्यामुळे भाषावाद पुन्हा ऐरणीवर आला आहे.

थोडक्यात

ऑनलाईन कॅब बुकिंगवरून सुरू झालेला वाद भाषेच्या मुद्द्यावर गेला

तरुणाचा संताप अनावर, भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण

व्हिडीओ व्हायरल; सोशल मीडियावर दोन्ही बाजूंवर टीका

अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार दाखल नाही

या घटनेमुळे पुन्हा एकदा ‘मराठी विरुद्ध हिंदी’ वादाचे राजकारण आणि सामाजिक परिणाम चर्चेत आले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!