
मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमी नवनवीन समीकरणं जुळताना दिसतात. मात्र यंदाच्या गणेशोत्सवाने मात्र एका वेगळ्याच राजकीय चर्चेला हवा दिली आहे. दीर्घकाळ दूर राहिलेले ठाकरे बंधू, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, यांची भेट आता चर्चेचा विषय ठरली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदा घरच्या गणपती दर्शनासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना खास आमंत्रण दिलं होतं. त्यानुसार बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलं आधार-आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले. या प्रसंगी राज ठाकरे व त्यांचे कुटुंबीय यांनी उद्धव ठाकरेंचे सस्नेह स्वागत केले.
गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दोन्ही भावंडांनी कुटुंबासह दर्शन घेतलं. त्यानंतर काही काळ मोकळ्या वातावरणात चर्चा झाली. या क्षणांचे छायाचित्रे समोर आल्यानंतर ‘गणपती बाप्पाने दोन्ही भावांना पुन्हा एकत्र आणलं’ अशीच चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरे यांच्या घरी दरवर्षी दीड दिवसांचा गणपती असतो. यासाठी शिवतीर्थवर नेहमीप्रमाणे सुंदर सजावट आणि भक्तिमय वातावरणाची तयारी करण्यात आली होती. यंदा मात्र या उत्सवाने राजकीय रंग अधिक गडद केला. कारण, राज ठाकरे यांनी स्वत: उद्धव ठाकरेंना फोन करून सहकुटुंब दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिलं होतं.
दोन्ही भावांच्या भेटीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी महत्त्वाचं संकेत दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातं. काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा “ठाकरे बंधूंची युती होणार का?” या प्रश्नाला जोर चढला आहे.