Uddhav Thackeray : मेक इन इंडियाच्या नावाखाली हुकूमशाह बनत असाल, तर हुकूमशाही गाडणार; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Published : Oct 04, 2026, 02:34 PM IST
Uddhav Thackeray speech Garjana Morcha

सार

भाजपने सूडबुद्धीने राजकारण करत लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. हा लढा देशाच्या आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी असल्याचे सांगत त्यांनी 'इंडिया अगेन्स्ट व्होटचोर'चा नारा दिला.

मुंबई : गर्जना मोर्च्यात उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. 'हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा, जात-पात, धर्माचा नाही, तर हा लढा आपल्या देशाचा, आपल्या स्वातंत्र्याचा लढा आहे. पहिल्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांनी घोषणा दिली होती मेक इन इंडिया. आम्हाला मान्य आहे. पण मेक इन इंडियामध्ये जर हुकूमशाहसुद्धा देशात बनणार आहे, तर त्याला देशातच गाडून टाकण्यासाठी आज आम्ही इथे आलो आहेत. पण मेक इन इंडियाच्या नावाखाली तुम्ही हुकूमशाह बनत असाल, तर तुमची हुकूमशाही आम्ही गाडून टाकली असं समजा', असा इशारच उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

'राजने सांगितलं, की आपल्या राज्यातले २ कोटी मतदार वगळले आहेत. देशातील १३ कोटी मतदार वगळले आहेत. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची लोकसंख्या देशाच्या मतदार यादीतून वगळली आहे. बंगाल, तमिळनाडूमधील अनुक्रमे ७० लाख, ३० लाख इतके वगळले आहेत. सरकारने सगळ्या व्यवस्था हातात घेतल्या आहेत. माझा पहिला आक्षेप निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीला आहे. निवडणूक आयोगाच्या नियुक्तीवरच आक्षेप आहे. जो आयुक्त संपूर्ण देशाच्या निवडणुकीवर लक्ष ठेवतो, त्याची निवडणूक न होता नेमणूक कशी होते? इंडिया अगेन्स्ट व्होटचोर ही घोषणा सगळीकडे पोहोचवा,' असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

''निवडणूक आयुक्तांच्या निवडणुकीत आधी सरन्यायाधिश होते, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते होते, आता यंदा सरन्यायाधिशांना वगळण्यात आलं. आणि त्यांच्या जागी एक मंत्री टाकले ते मंत्री होते अमित शाह. राहुल गांधींनी यावर आक्षेप घेतला, असहमती दाखवली, पण तरीही सरकारकडून ज्ञानेश कुमारांची नेमणूक झाली. ही नेमणूकचं पक्षपाती आहे.'

‘भाजपला सरकार चालवता येत नाही. ज्याप्रकारे हे सरकार चालवत आहेत, त्याला सूड उगवणं म्हणतात. सरकारचं काम कायदा, सुव्यवस्था राखणं आहे. ठाण्यात पुर्णेकरांची हत्या झाली. गृहमंत्री आहेत कुठे? देशभर महिलांवर अत्याचाराच्या घटना ऐकू येतात, आहे कुठे तुमचं हिंदूत्ववादी सरकार? राज्यात दुष्काळ पडला आहे. अन्नदात्यावर जी परिस्थिती आहे, त्याची कल्पना करू शकत नाही. परिस्थिती वाईट आहे, गोरगरिब करणार काय? इथे कोणी जात नाही. सरकारला याचं काही पडलेलं नाही. राम मंदिराची दानपेटी चोरणारे निर्घुण गुन्हेगार तुम्ही, पक्ष चोरणारे षंड तुम्ही’

'ज्ञानेश कुमार सरकारचं हत्यार आहे. आधी मत देण्याची चोरी नव्हती. आता मतचोरी हे करतात, मतदानाचा अधिकार हे काढून घेतात. प्रशासन ताब्यात घेतलं आहे. पण रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत, त्यामुळे तुम्हाला रस्त्यावर चालणं कठीण होईल. जर तुम्ही एवढा मोठा पक्ष आहे, एवढा मोठं काम केलं आहे, बहुमताने तुम्ही निवडून येताय, तर संपूर्ण देशात आजपर्यंत जेवढ्या शिव्या पंतप्रधानांना पडल्या नाही, तेवढ्या शिव्या या पंतप्रधानांना पडत आहेत. दिलं काहीच नाही, तर सगळं ओरबाडून घेतलं आहे या सरकारने', अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Raj Thackeray : दोन महत्त्वाच्या मागण्या; गर्जना मोर्च्यात राज ठाकरे काय म्हणाले? भाषण जसंच्या तसं
Mumbai Protest : मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी