BMC Hospital : रडणे थांबवण्यासाठी नवजात बाळाच्या तोंडाला नर्सने चिकटपट्टी लावल्याचे प्रकरण, पोलिसांकडून गुन्हा दाखल

BMC Hospital News : रडणे थांबवण्यासाठी नवजात बाळाच्या तोंडाला चिकटपट्टी लावण्याचा संतापजनक प्रकार सरकारी हॉस्पिटलमध्ये घडला होता. याप्रकरणी तीन नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

BMC Hospital News : बदलापूर येथील रहिवासी असणाऱ्या प्रिया कांबळे नावाच्या महिलेने भांडुपमधील सरकारी रुग्णालयाविरोधात खळबळजनक दावा केला होता. या महिलेने सांगितलेल्या माहितीनुसार, 2 जून 2023 रोजी भांडुपमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये एनआयसीयूमध्ये दाखल केलेल्या तिच्या नवजात मुलाच्या तोंडावर चिकटपट्टी लावल्याचे तिला आढळले. या प्रकरणी आता तीन नर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हा धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्यानंतर बाळाला डिस्चार्ज मिळावा, यासाठी तिने आपल्या पालकांसह माजी नगरसेवकाला बोलावून घेतले होते. यावेळेस त्यांनी हॉस्पिटलमधील अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचीही माहिती समोर आली होती. 

तक्रारीची पोलिसांकडून दखल 

काही महिन्यानंतर वकील तुषार भोसले यांनी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे (Maharashtra State Human Rights Commission) या घटनेबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार बीएमसी आणि पोलिसांनी समन्स पाठवण्यात आला. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने दाखल केलेल्या तक्राराची दखल घेत भांडुप पोलिसांनी गुरुवारी (22 फेब्रुवारी) या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

नेमके काय आहे प्रकरण?

प्रिया कांबळे या महिलेने वर्ष 2022मध्ये युगंधर कांबळेसोबत लग्न केले. यानंतर 20 मे 2023 रोजी सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये तिने एका मुलाला जन्म दिला. तीन दिवसांनंतर हॉस्पिटलमधून तिला डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान बाळाचे शरीर पिवळे पडल्याने प्रिया तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.

पण जोपर्यंत बाळ स्तनपान करत नाही, तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्याची आवश्यकता नाही, असे डॉक्टरांनी प्रियाला सांगितले. पण बाळाच्या आरोग्यामध्ये सुधारणा होत नसल्याने अखेर त्याला 31 मे 2023 रोजी एनआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धक्कादायक प्रकार आला समोर

यानंतर 2 जून 2023 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास प्रिया आपल्या मुलाला उचलून घेण्यासाठी त्याच्या जवळ गेली असता तिला त्याच्या तोंडावर चिकटपट्टी लावल्याचे दिसले. तिने लगेचच बाळाच्या तोंडावरील चिकटपट्टी काढली. यामुळे त्याच्या चेहरा व मानेवर लाल पुरळ देखील आले होते.

या धक्कादायक प्रकाराबाबत तिने चौकशी केली असता नर्स श्वेताने तिला सांगितले की, बाळाचे रडणे थांबवण्यासाठी चिकटपट्टी लावावी लागली, अशी हादरवणारी माहिती एका अधिकाऱ्याने सांगितली. 

नंतर प्रियाच्या पालकांनीही नर्स सविता भोईर यांच्याशी संपर्क साधून जाब विचारला. “बाळ रडत असल्याने चिकटपट्टी लावावी लागते, यामध्ये काहीही नवीन बाब नाही. उगाच गोंधळ घालू नका”, असे संतापजनक उत्तर नर्सकडून देण्यात आले.

आणखी वाचा

PM Narendra Modi : वाराणसीत पोहोचताच PM नरेंद्र मोदींनी शिवपूर-फुलवारिया-लहारतारा मार्गाची केली पाहणी

Manohar Joshi : राजकारण, समाजकारणातील सर्वांचे 'सर', सुसंस्कृत-व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला - CM एकनाथ शिंदे

Share this article