
ठाणे : देशभरात नीट परीक्षा पेपरफुटीच्या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला असताना आज पुन्हा एकदा टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आली आहे. शिक्षकांच्या परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. उद्या २८ जून रोजी टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा होणार होती. मात्र त्याआधीच शनिवारी २७ जून रोजी या परीक्षेचा पेपर लीक झाला. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलं आहे. भिवंडी इथे पेपर लिक प्रकरणातील ही कारवाई करण्यात आली असून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोनगाव येथील एका डायमंड हॉटेलमध्ये पेपर लीक प्रकरणातील संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या गुप्त माहितीआधारे पोलिसांचं पथक हॉटेलमध्ये दाखल झालं. पण तिथे संशयित सापडला नाही. त्यानंतर सहारा एअरपोर्ट परिसरातून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या. पुढील तपासासाठी पोलिसांनी आरोपींना भिवंडीत आणत टीईटी पेपर लीक प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रभरातून ६ लाख १२८ विद्यार्थांनी या शिक्षक पात्रता परीक्षेला बसण्यासाठी नोंदणी केली होती. आता पेपर फुटल्यानंतर उद्या २८ जून रोजी होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची नवीन तारीख पुढील दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या परीक्षेसाठी पुन्हा नव्याने विद्यार्थ्यांना कोणतीही नोंदणी करावी लागणार नाही किंवा फी भरावी लागणार नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिली आहे.
तसंच परीक्षेआधी टीईटी परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी काही माहिती दिली होती. त्यानुसार, विद्यार्थ्यांनी परीक्षेला दीड तास आधी येण्याचं सांगितलं होतं. परीक्षा केंद्रांवर कोणतेही गैरप्रकार टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना बूट घालण्यास मनाई असून त्यांनी सँडल, चप्पल घालण्याचंही सांगण्यात आलं होतं.