
मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनस येथे शनिवारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेत आरपीएफच्या कॉन्स्टेबल राम नारायण सिंह यांनी आपल्या प्रसंगावधानाने आणि समयसूचकतेने एक अमूल्य जीव वाचवला. एका प्रवाशाचा पाय घसरून तो ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या धोकादायक गॅपमध्ये पडला होता. त्या क्षणी ड्युटीवर असलेल्या कॉन्स्टेबल सिंह यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत जीव धोक्यात घालून त्या प्रवाशाला सुरक्षित मागे खेचले. या धाडसी कृतीमुळे त्या प्रवाशाला दुसरे जीवन मिळाले.
३० मे रोजी, लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वरून गरीब रथ एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 12201) कोचुवेलीच्या दिशेने सुटत होती. गाडी चालू असतानाच एका प्रवाशाने चढण्याचा प्रयत्न केला आणि तो थेट ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममधील जागेत कोसळला. या क्षणाचे गांभीर्य ओळखून कॉन्स्टेबल राम नारायण सिंह क्षणाचाही विलंब न करता धावत गेले आणि त्या प्रवाशाला घट्ट पकडून मागे ओढले. सदर प्रवासी मानसिक दृष्ट्या अस्थिर अवस्थेत असल्याचेही पुढे आले असून, त्याला तातडीने समुपदेशन आणि आवश्यक मदत पुरवण्यात आली आहे.
कॉन्स्टेबल सिंह यांच्या या धाडसी कृतीचे संपूर्ण रेल्वे प्रशासन, प्रवासी वर्ग आणि नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे. मध्य रेल्वेने देखील त्यांच्या कृतीला "आदर्शवत" म्हणत अभिनंदन केले आहे. “राम नारायण सिंह हे केवळ एक कर्मचारी नाहीत, तर खऱ्या अर्थाने जीवनरक्षक आहेत,” असे गौरवोद्गार अनेकांनी व्यक्त केले.
या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, सुरक्षा दलातील कर्मचारी केवळ शिस्तीचे पालन करणारे नाहीत, तर आवश्यक तेव्हा जीवाची बाजी लावणारे खरे वीरसैनिक आहेत. राम नारायण सिंह यांचे कार्य हे इतर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
क्षणभराचा निर्णय आणि प्रसंगावधान लाखमोलाचे ठरू शकते, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. कॉन्स्टेबल राम नारायण सिंह यांचं हे धाडस त्यांच्या सेवाभावाचं प्रतिक आहे. त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला सलाम करत, समाजाने अशा कर्मचार्यांना केवळ सरकारी अधिकारी न मानता, खरे नायक मानले पाहिजे.