Ritu Tawde BMC Mayor : ‘टँकर माफिया फ्री मुंबई’चा संकल्प; पाणीपट्टी दरवाढीला स्थगिती – महापौर रितू तावडे यांची मोठी घोषणा

Published : Feb 12, 2026, 10:29 AM IST
BMC Mayor

सार

Ritu Tawde BMC Mayor : मुंबईच्या नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी दरवर्षी होणाऱ्या ८ टक्के पाणीपट्टी दरवाढीला स्थगिती देण्याची आणि ‘टँकर माफिया फ्री मुंबई’ धोरण राबवण्याची घोषणा केली.

Ritu Tawde BMC Mayor : मुंबईकरांना मोठा दिलासा देत नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी दरवर्षी होणाऱ्या ८ टक्के पाणीपट्टी दरवाढीला स्थगिती देण्याची घोषणा केली आहे. ‘विकसित मुंबई, सुरक्षित मुंबई’ या महायुतीच्या वचनाशी कटिबद्ध राहून शहरात ‘टँकर माफिया फ्री मुंबई’ धोरण राबवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पालिका सभागृहात बिनविरोध निवडीनंतर तावडे यांनी सहा पानी भाषणातून आपले विकासाचे व्हिजन मांडले.

बिनविरोध निवड; संजय घाडी उपमहापौर

मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे आणि उपमहापौरपदी संजय घाडी यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पीठासीन अधिकारी म्हणून ही निवड जाहीर केली. विरोधी पक्षांकडून कोणताही अर्ज न आल्याने निवडणूक एकमताने पार पडली.

पाणीपुरवठ्यात सुधारणा; अतिरिक्त पाण्याचे आश्वासन

महापौर तावडे यांनी पुढील पाच वर्षांत सर्व पाणीपुरवठा प्रकल्प पूर्ण करून अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक विभागात पाणी गळती शोधण्यासाठी यंत्रणा आणि कॅमेरे बसवले जातील. समान पाणी वितरणासाठी फ्लो मीटर बसवले जातील. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या नागरिकांना जलदेयक आणि मालमत्ता करात सवलत देण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला.

महापौर निधीत वाढ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीप्रमाणे महापौर निधी ५ हजारांवरून ५० हजारांपर्यंत वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे तावडे यांनी सांगितले. तसेच शाळांमध्ये संविधानातील मूल्यांचे शिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

खड्डेमुक्त मुंबईसाठी ‘युटिलिटी टनेल’

रस्त्यांवरील खड्ड्यांचा कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुंबईत युटिलिटी टनेल उभारण्यात येतील. नऊ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते डांबरी आणि त्यापेक्षा जास्त रुंदीचे रस्ते काँक्रीटचे करण्यात येतील. पादचारी स्नेही पदपथ आणि भुयारी तसेच जमिनीवरील पार्किंगची सुविधा वाढवली जाईल.

फेरीवाल्यांसाठी नियोजित हॉकिंग झोन्स

मुंबईतील पात्र फेरीवाल्यांचे हॉकिंग झोन्समध्ये पुनर्वसन केले जाईल. हॉकिंग झोन्स वगळता इतर क्षेत्रे नॉन-हॉकिंग झोन्स म्हणून घोषित केली जातील. सर्व फेरीवाल्यांना सर्वेक्षणानंतर विक्रेता प्रमाणपत्र आणि ओळखपत्र देण्यात येईल.

गगराणी यांची भूमिका

पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या निवृत्तीला अवघे ४० दिवस उरले असून, प्रशासक म्हणून त्यांनी अनेक प्रकल्प मार्गी लावले. पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी महापौर व उपमहापौर निवड प्रक्रियाही यशस्वीपणे पार पाडली. पुढील काळात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

PREV
Mumbai News (मुंबई बातम्या): Read Mumbai LIVE Updates and Latest News Today. Check मुंबई राजकीय बातम्या, मुंबई क्राईम न्यूज, मुंबई ब्रेकिंग न्यूज. Watch Mumbai Viral News Videos, Photos, and Mumbai Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Viral Video : आई दुचाकी चालवत होती, मागे बसलेल्या चिमुकल्याने जे केलं ते पाहून तुम्हीही कौतुक कराल
Mumbai Heatwave : मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट, IMD चा यलो अलर्ट