
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती सुळे आणि सारंग लाखानी यांचा विवाहसोहळा २० जून २०२६ रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. हा सोहळा फक्त एक कौटुंबिक कार्यक्रम नव्हता, तर राजकारण, बॉलिवूड आणि उद्योग जगतातील मोठ्या नावांचा संगम ठरला. या लग्नाला सलमान खान, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, अंबानी कुटुंब, ठाकरे कुटुंब यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे दिसले. तर, आदल्या दिवशी झालेल्या संगीत कार्यक्रमात शाहरुख खानच्या उपस्थितीने आणखीनच रंगत आणली. आता या हाय-प्रोफाइल लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
२० जून रोजी मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या या भव्य सोहळ्यात रेवती सुळे आणि सारंग लाखानी यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच सर्वांसमोर येत लक्ष वेधून घेतलं. पांढरेशुभ्र वेडिंग आऊटफिटमध्ये दोघेही खूपच आकर्षक दिसत होते. हा विवाहसोहळा म्हणजे ग्लॅमर आणि भव्यतेचं एक शानदार मिश्रण ठरला.
या लग्नात सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या त्या सलमान खानच्या नव्या लुकवर. सलमान ऑल-ब्लॅक आऊटफिटमध्ये कार्यक्रमात पोहोचला. त्याने काळा शर्ट, काळी ट्राउझर आणि त्यावर कॅप घातली होती, ज्यामुळे त्याचा नवा बाल्ड लूक चर्चेत आला. कडक सुरक्षेत पोहोचलेल्या सलमानच्या एन्ट्रीने फोटोग्राफर्स आणि पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांच्यासोबत लग्नाला हजेरी लावली. पारंपरिक कपड्यांमध्ये बच्चन कुटुंब सोहळ्याची शान वाढवत होतं. त्यांच्या उपस्थितीने या लग्नाला आणखी प्रतिष्ठा मिळाली.
रणबीर कपूरही या खास प्रसंगी ऑल-ब्लॅक लूकमध्ये दिसला. त्याचा क्लीन-शेव्ह चेहरा आणि फिट शरीरयष्टी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. मात्र, कामात व्यस्त असल्यामुळे आलिया भट्ट या सोहळ्याला येऊ शकली नाही. रणबीरने नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी या सोहळ्याला खास अंदाजात हजेरी लावली. अनंतने नेव्ही ब्लू कुर्ता-पायजमा आणि त्यावर गोल्डन वेस्टकोट घातला होता, तर राधिका गोल्डन-व्हाइट टिश्यू साडीत खूपच सुंदर दिसत होती. त्यानंतर मुकेश अंबानी आणि नीता अंबानी हेदेखील सोहळ्यात पोहोचले. त्यांच्या उपस्थितीने हा कार्यक्रम आणखी हाय-प्रोफाइल बनला.
या लग्नाला फक्त चित्रपटसृष्टीतीलच नव्हे, तर राजकारण आणि उद्योग जगतातील अनेक दिग्गज मंडळीही उपस्थित होती. आदित्य ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अनिल अंबानी आणि चित्रपट निर्माता रितेश सिधवानी यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे सोहळ्यात दिसले. त्यामुळे हे लग्न वर्षातील सर्वात चर्चेतल्या सामाजिक कार्यक्रमांपैकी एक ठरलं आहे.
रेवती सुळे आणि सारंग लाखानी यांचा संगीत सोहळा १९ जून रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शाहरुख खानने आपल्या उपस्थितीने चार चाँद लावले. शाहरुखने नवविवाहित जोडप्यासोबत मंचावर डान्सही केला. त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ऑल-ब्लॅक लूकमध्ये आलेल्या शाहरुखने नेहमीप्रमाणेच आपल्या स्टाइल आणि करिश्माने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.