
Raj Thackeray Uddhav Thackeray Sabha : नाशिकनंतर आता ठाकरे बंधूंची राजकीय तोफ मुंबईत धडकणार आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे यांची आज शिवाजी पार्कवर भव्य संयुक्त सभा होणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येत असल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेना पक्ष सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र शिवाजी पार्कवर सभा घेत आहेत. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या सभेकडे केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू या सभेतून मराठी मतदारांना आणि मुंबईकरांना नेमकी कोणती दिशा दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. राज ठाकरे यांचा पुन्हा एकदा चर्चित “लाव रे तो व्हिडीओ” स्टाईलचा हल्लाबोल पाहायला मिळणार का, याचीही उत्सुकता आहे.
या संयुक्त सभेच्या माध्यमातून ठाकरे बंधू मोठे शक्तीप्रदर्शन करणार आहेत. शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार आणि मुंबईच्या राजकारणासाठी कोणते संकेत देणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
मुंबईतील संयुक्त सभेपूर्वी शाखाभेटीदरम्यान राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन केलं आहे. “शिवतीर्थावर या… इंजिनमध्ये बसून मुंबईतील विरोधकांना मशालीने जाळून टाकू,” असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं. काल मुंबईतील विविध मनसे शाखांना भेटी देताना त्यांनी हे विधान केलं आहे.
ठाकरे बंधू मुंबईनंतर ठाण्यातही संयुक्त सभा घेणार आहेत. 12 जानेवारी रोजी ठाण्यात ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात ठाकरे बंधूंची सभा होणार आहे, त्याच भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रचार रॅली काढणार आहेत.
ठाण्यातील विविध भागांमध्ये एकनाथ शिंदे आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरणार असून, संध्याकाळी भाईंदर पूर्व येथे त्यांची सभा होणार आहे. त्यामुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.