
पुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाबाबतची इच्छा आणि खंत जाहीरपणे व्यक्त केली आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्यांनी मिश्किलपणे, पण स्पष्ट शब्दांत सांगितले, "मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण कुठे जमतंय? कधी ना कधी योग येईल."
कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर प्रतिसाद देताना अजित पवार म्हणाले, "महिला मुख्यमंत्री व्हावी, असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यासाठी योग्य संधी, योग्य वेळ आणि राजकीय समीकरणं जुळायला हवीत. ममता बॅनर्जी आणि जयललिता यांसारख्या महिलांनी स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्रीपद गाठलं, ही उदाहरणं आपल्या पुढे आहेत."
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्र हे शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचे राज्य आहे. इथे सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, ताराराणी यांच्यासारख्या महिलांनी योगदान दिलं आहे. त्यामुळे इथेही महिला मुख्यमंत्री होणे शक्य आहे. राजकारणात मतभेद होतातच, पण मनभेद होऊ नयेत. अनेक वेळा राजकारणापलीकडे जाऊन मैत्री टिकवलेली दिसते, हे महत्वाचं आहे."
२०१० – काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये (मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण)
२०१२ – पुन्हा उपमुख्यमंत्री
नोव्हेंबर २०१९ – अल्पायुषी भाजप सरकारात देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत
महाविकास आघाडी सरकारमध्ये – उद्धव ठाकरे यांच्या बरोबर
२०२२ – एकनाथ शिंदे सरकारमध्ये बंडखोरीनंतर पुन्हा उपमुख्यमंत्री
२०२४ – महायुती सरकारमध्ये पुन्हा उपमुख्यमंत्री
या दीर्घ राजकीय प्रवासात अजित पवार अनेकदा मुख्यमंत्रीपदाच्या उंबरठ्यावर येऊनही, ते पद त्यांना मिळालेले नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा "मुख्यमंत्री व्हायचं आहे" ही भावना आणि त्यामागची खंत स्पष्टपणे समोर आली.