Sakinaka Incident : मुंबईत गटारीच्या बोगद्यात पडून मृत्यू, मुंबई पालिका आयुक्ताचं उत्तर ऐका

Published : Jul 02, 2026, 07:08 PM IST
Mumbai Sakinaka Manhole

सार

Sakinaka Manhole Incident : साकीनाका परिसरात एक व्यक्ती उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर मुंबई पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी माहिती दिली आहे. 

मुंबई : मुंबईत पहिल्याच पावसात मोठी दुर्घटना घडली. साकीनाका परिसरात एका उघड्या मॅनहोलमध्ये पडून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अस्लम अन्सारी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. साकीनाका येथील खैराणी रोड भागातील सन्मान हॉटेलजवळ उघड्या मॅनहोलमध्ये मोबाईलवर बोलत जात असताना अस्लम मॅनहोलमध्ये पडले. खासगी कंत्राटदाराकडून देखभाल काम सुरू असताना मॅनहोलचे झाकण उघडं होतं. पाण्याचा वेग जास्त असल्याने ते वाहून गेले. या संपूर्ण दुर्घटनेबाबत मुंबई पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी माहिती दिली. तसंच पावसाळापूर्वीच्या कामांबाबतही आढावा दिला.

मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या दुर्घटनेबाबत काय म्हणाल्या अश्विनी भिडे?

'साकीनाका येथील दुर्घटनेची उच्च न्यायलयाने दखल घेतली आहे. आतापर्यंत महानगरपालिकेकडून याआधीच्या घटनेचा आढावा घेत सर्व मॅनहोलवर जाळी बसवण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईत १,०३,९२६ मॅनहोल आहेत. या मॅनहोलवर सुरक्षिततेसाठी जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. ९६,३८३ मॅनहोलवरील जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. मधल्या काळात रस्त्यांची कामं हाती घेण्यात आली होती. त्यावेळी १८०० हून अधिक मॅनहोल राहिले नसल्याने तिथे जाळ्यांची आवश्यक्यता उरली नाही. ४४४६ मॅनहोल रस्त्यांच्या कामांसाठी उघडी करावी लागली होती. कामं पूर्ण झाल्यानंतर आता मॅनहोलवरील जाळ्या आणि त्यावर झाकणं लावली जात आहेत. रस्त्यांच्या कामांसाठी किती जाळ्या काढण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर किती लावण्यात आल्या आहेत याचा तपशील नुकताच उच्च न्यायालयात देण्यात आला होता.'

'आजची घटना एल वॉर्डमध्ये घडली. या वॉर्डमध्ये ७५ मॅनहोलवरील जाळ्या लावायच्या बाकी होत्या. मात्र नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, एल वॉर्डमध्ये केवळ चार मॅनहोलवर जाळ्या बसवण्याचं काम बाकी राहिलं होतं. त्यापैकी एक मॅनहोलवरील जाळी लावण्याचं काम हाती घेतलं असताना, काम करत असताना दुर्घटना घडली. ज्या सुरक्षिततेसाठी मॅनहोलमवरील जाळ्या लावायचं काम चालू होतं, ते काम करताना सुरक्षितता पाळली गेली नाही. हे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरने, त्याच्या कामगारांनी, सुपरवायजर्सनी सुरक्षिततेची काळजी घेण्याची गरज होती, ती काळजी घेतली गेली नाही. त्यांनी बॅरिकेट्स लावणं गरजेचं होतं, त्यावर ट्रायपॉड ठेवणं गरजेचं होतं. मात्र ज्यावेळी आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासलं, त्यावेळी तिथे अशी कोणतीही सुरक्षा दिसली नाही. तिथे दोन माणसं उभी केली होती. ती माणसं येणाऱ्या-जाणाऱ्यांना सूचना देतही असतील, मात्र घाईत असणाऱ्यांना या सूचना समजू शकत नाही. इथे दुर्देवाने काळजी न घेतल्याने पादचारी तिथे पडले आणि त्यांचा मृत्यू झाला. ही अतिशय गंभीर घटना आहे.'

'मागील तीन महिन्यांपासून पावसाळ्यापूर्वीची तयारी करण्यासाठी केलेल्या कामांमध्ये सर्व मॅनहोलवर जाळ्या बसवणं, सर्व मॅनहोल सुरक्षित आहेत, की नाही, सर्वांवर जाळ्या, झाकणं आहेत की नाही हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता, ही सर्व माहिती तपासली जात होती. सर्व कामं ३१ मे पूर्वी होण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापैकीच हे राहिलेलं काम होतं, त्यातच सुरक्षेच्या अभावामुळे दुर्घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे.'

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Sanjay Raut | एकेदिवशी ऑपरेशन कमळची, राऊत यांचा दावा
साकीनाका खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये पडला माणूस, व्यक्तीबद्दल मोठी अपडेट समोर