
मुंबई मेट्रो स्टेशनवरील एका पारदर्शक तिकीट बॉक्समध्ये आरामात झोपलेल्या मांजरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. एरवी मेट्रो प्रवासात गर्दी आणि लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. पण, तिकीट टाकण्याच्या बॉक्सलाच आपला बेडरूम बनवणाऱ्या या मांजरीने प्रवाशांचं आणि नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
श्रेया शाजी या इन्स्टाग्राम युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पारदर्शक बॉक्समध्ये टाकलेल्या मेट्रो तिकिटांवर हे मांजर गोल मुटकुळी करून शांत झोपलं आहे. बॉक्स पारदर्शक असल्यामुळे मांजरीची झोप आणि तिचे हावभाव स्पष्ट दिसत आहेत. मेट्रो स्टेशनवर एवढी गर्दी आणि गोंधळ असूनही, हे मांजर कसलीही पर्वा न करता आपल्या झोपेचा आनंद घेत आहे, हीच या व्हिडिओची खासियत आहे.
"कुणाला तरी वाटलं असेल की हे तिकीट आहे, म्हणून त्यांनी मांजरीला उचलून बॉक्समध्ये टाकलं असावं," अशा आशयाचं भन्नाट कॅप्शन देत श्रेयाने हा व्हिडिओ शेअर केला. या कॅप्शनमुळे व्हिडिओची रंगत आणखी वाढली. या व्हिडिओला आतापर्यंत ५.३८ लाख व्ह्यूज आणि २८,००० लाईक्स मिळाले आहेत. मांजरीच्या या झोपेवर सोशल मीडियावर अनेक मजेशीर कमेंट्स येत आहेत. काहींनी तर या मांजरीला मुंबई मेट्रोची 'चीफ फेलाइन ऑफिसर' (Chief Feline Officer) असं म्हटलं आहे. गुंदवली मेट्रो स्टेशनवर याआधीही मांजरींनी प्रवाशांचं लक्ष वेधून घेतल्याचं रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. रोजच्या धावपळीच्या प्रवासात अचानक दिसलेलं हे दृश्य आता मुंबई मेट्रोतील सर्वात मजेशीर व्हायरल क्षणांपैकी एक बनलं आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर आपल्याला मिळणाऱ्या या प्रसिद्धीची कोणतीही कल्पना नसलेलं हे मांजर आपल्या 'तिकीट बॉक्स बेडरूम'मध्ये अजूनही शांत झोपलेलं आहे.