
Mumbai : दादरमध्ये जैन समाजाने मृत कबुतरांसाठी प्रार्थना सभेचं आयोजन केलं. या सभेत कबुतरांच्या संरक्षणासाठी प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. मुंबईतील बंद झालेल्या कबुतरखान्यांमुळे अनेक कबुतरे रस्त्यावर येत असून अपघातात मृत्यू होत असल्याचा दावा केला गेला.या सभेमध्ये जैन मुनींनी आक्रमक भूमिका घेत नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. “आमचेच आमदार, आमचेच खासदार असतील,” असे ठाम वक्तव्य करत त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीही तयारी दर्शवली आहे.याशिवाय ‘शांती दूत जनकल्याण पार्टी’ या राजकीय पक्षाची देखील घोषणा केली.
जैन समाजाच्या सभेनंतर ‘आम्ही गिरगांवकर’ संघटना आक्रमक झाली असून, सोशल मीडियावर “कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान” अशा पोस्टर्स व्हायरल झाले आहेत. संघटनेने कबुतरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याची सुरुवात प्रत्येक मराठी नागरिकांनी करावी, असा इशारा दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेने शहरातील कबुतरखाने बंद केले होते, ज्यावर जैन समाजाने तीव्र विरोध केला होता. दादर परिसरात रस्ता रोखून आणि ताडपत्री फाडून विरोध दर्शवण्यात आला होता. प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तो वाद थंडावला होता, पण आता नव्या कृतीमुळे तो पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नवीन कबुतरखाने उभारण्याची घोषणा केली होती. त्यावर प्रतिक्रिया म्हणून ‘आम्ही गिरगांवकर’ संघटनेने म्हटले की, जिथे जिथे कबुतरखाने उभारले जातील, तिथे चिकन-मटण सेंटर उभारण्याची भूमिका घेण्यात येईल. लोढा यांच्या निर्णयाला तीव्र विरोध केला जात आहे आणि महापालिकेला विरोधी पत्र दिले गेले आहे.