Mumbai : मालाड ते ऐरोली थेट प्रवास होणार सुखकर, गोरेगाव-मुलुंड जोड मार्गामुळे उत्तर मुंबईतील वाहतूकीसही होणार फायदा

Published : Nov 02, 2025, 09:21 AM IST
Mumbai

सार

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातील 5.3 किमी जुळ्या बोगद्याच्या बांधकामासाठी चित्रनगरी परिसरात प्राथमिक उत्खनन वेगात सुरू आहे. पहिल्या टीबीएमचे घटक दाखल झाले आहेत. 

Mumbai : गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात 5.3 किलोमीटर लांबीच्या तिहेरी मार्गिकेच्या जुळ्या बोगद्याचे प्राथमिक उत्खनन जलदगतीने सुरू आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या दोन अत्याधुनिक टनेल बोअरिंग मशीनपैकी (टीबीएम) एका मशीनचे सर्व घटक कार्यस्थळी दाखल झाले आहेत. ऑगस्ट 2026 मध्ये प्रत्यक्ष खोदकामास सुरुवात होणार असून त्यानंतर कामाला अधिक गती मिळेल. कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

चार टप्प्यांत प्रकल्पाची अंमलबजावणी

मुंबई महापालिकेचा गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प हा चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा 3(ब) अंतर्गत चित्रनगरी परिसरात 5.3 किमी बोगद्याचे लॉन्चिंग शाफ्ट उत्खनन सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त बांगर यांनी शुक्रवारी स्थळ पाहणी करत प्रगतीची माहिती घेतली आणि संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

जपानहून आले टीबीएमचे घटक

बोगदा बांधकामासाठी दोन अत्याधुनिक टीबीएम आवश्यक असून पहिल्या मशीनचे 77 कंटेनरमधील घटक जपानहून चित्रनगरीत दाखल झाले आहेत. दुसऱ्या टीबीएमचे घटक डिसेंबर 2025 पर्यंत येण्याची अपेक्षा आहे. पहिल्या मशीनची जोडणी ऑगस्ट 2026 पर्यंत तर दुसऱ्या मशीनची जोडणी ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, ज्यांनतर प्रत्यक्ष खोदकाम सुरू होईल.

तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान

तिहेरी मार्गिकेच्या पेटी बोगद्याचे काम हे अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक समजले जात आहे. दोन्ही बोगद्यांची एकूण लांबी 5.3 किमी असून पेटी बोगद्यासह एकूण अंतर 6.62 किमी असेल. प्रत्येक बोगद्याचा व्यास 14.42 मीटर असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर हे बोगदे मुंबईतील सर्वात मोठे टनेल म्हणून नोंदवले जातील.

मालाड ते ऐरोली थेट जोडणी

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मालाड ते ऐरोली थेट जोडणी साध्य होणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा चौथा प्रमुख मार्ग असून, उत्तर मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यास तो महत्त्वाची भूमिका निभावणार आहे. पश्चिम किनारी रस्ता, मालाड माईंडस्पेस ते ऐरोली असा थेट मार्ग उपलब्ध होणार आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मुंबईकरांचा प्रवास आता अधिक 'कूल'! पश्चिम रेल्वेवर धावणार १२ नवीन AC लोकल; पाहा तुमच्या स्टेशनची वेळ आणि पूर्ण वेळापत्रक
Maharashtra Election Result 2026 : फडणवीस, उद्धव, राज, शिंदे यांचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल