मुंबईवर शोककळा, भारत-पाकिस्तान युद्धात मुंबईकर धारातिर्थी, घाटकोपरचे मुरली नाईक शहीद

Published : May 09, 2025, 03:33 PM IST
Mumbai Jawan

सार

या संघर्षात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये मुंबईतील घाटकोपर परिसरातील रहिवासी मुरली श्रीराम नाईक यांचाही समावेश आहे.

मुंबई - भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या निर्णायक हल्ल्यांनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरू करण्यात आला आहे. भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला करारा प्रतिकार केला असून दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या संघर्षात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये मुंबईतील घाटकोपर परिसरातील रहिवासी मुरली श्रीराम नाईक यांचाही समावेश आहे.

दहशतवाद्यांच्या तळांवर भारताची निर्णायक कारवाई

भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. ही कारवाई अत्यंत अचूक आणि धोरणात्मक होती. यामुळे पाकिस्तानच्या बाजूने अस्वस्थता पसरली असून त्यांनी जम्मू-काश्मीर जवळील सीमेवर गोळीबार सुरू केला आहे. या गोळीबारात भारतीय जवानांनी दिलेले प्रत्युत्तर अत्यंत प्रभावी ठरत असून पाकिस्तानच्या रेंजर्सना मोठा फटका बसला आहे.

शहीद मुरली नाईक यांचा जीवनप्रवास

शहीद मुरली श्रीराम नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी होते. त्यांचे कुटुंब मुंबईच्या घाटकोपर परिसरातील कामराज नगर येथे राहत होते. मात्र, झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात त्यांचे घर गेल्यामुळे त्यांची घरे तोडण्यात आली व कुटुंब आंध्र प्रदेशात परतले. मुरली नाईक यांनी लष्करात भरती होऊन देशसेवेचे व्रत घेतले आणि 9 मे रोजी पहाटे तीन वाजता झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षात त्यांनी वीरमरण पत्करले.

स्थानिकांनी दिली श्रद्धांजली

घाटकोपरमधील वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि राजकीय प्रतिनिधींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मुंबईतील झोपडपट्टीतून देशासाठी शहीद होणारा मुरली नाईक यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी ठरतो.

आंध्राच्या मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरद्वारे मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे," असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दुसरे शहीद जवान – दिनेश शर्मा

या संघर्षात दुसरे शहीद झालेले जवान दिनेश शर्मा हे पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशासाठी त्यांनी दिलेले बलिदान देशवासीय कधीही विसरणार नाहीत.

PREV

Recommended Stories

Mumbai Local : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! स्वयंचलित दरवाज्यांसह नव्या लोकल लवकरच धावणार, प्रवास होणार अधिक सुरक्षित
मुंबईत सर्वाधिक CO₂ उत्सर्जन; दिल्ली, पुणे, बंगळूरमध्येही धोकादायक पातळी!