
मुंबई : भायखळा परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी २६ जून रोजी पार पडलेल्या मोहरमच्या मिरवणुकीत पेन किलरच्या नावाखाली उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटल्याचा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे. या पेन किलरच्या गोळ्या समजून उंदिर मारण्याचं औषध खाल्लेल्या काही लोकांची प्रकृती बिघडल्याचं समोर आलं आहे. तर एकाची प्रकती अतिशय गंभी असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी महत्त्वाची बाब म्हणजे उंदिर मारण्याच्या गोळ्यांचं वाटप करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहात पकडलं आहे. मुंबई पोलिसांच्या या कामगिरीमुळे, सतर्कतेमुळे पुढील मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून तब्बल १४ हजार उंदिर मारण्याच्या विषारी गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. गोळ्या पेन किलर असल्याचं सांगत वाटप करण्यात आल्या होत्या. हा ३९ वर्षीय आरोपी मूळचा पुण्याचा असल्याचं समोर आलं असून त्याचं नाव फैयाज प्रेमजी असल्याचं समोर आलं आहे.
पोलीस उपायुक्त जयंत मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने काही लोकांना जीवे मारण्याच्या उद्देशाने उंदिर मारण्याचं विषारी औषध १०० किलो झिंक फॉस्फाईड ऑनलाईन मागवलं होतं. त्याशिवाय ३० हजार रिकामी असलेल्या कॅप्सूल मागवल्या होत्या. या कॅप्सूलमध्ये एक ग्रॅम अशा पद्धतीने झिंक फॉस्फाईड भरुन त्या गोळ्या लोकांमध्ये वाटल्या. मिरवणुकीत संशियत व्यक्ती कॅप्सूल वाटप करत असल्याची माहिती काही लोकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तरुणाला ताब्यात घेतलं.
सुरुवातीला त्याने पेन किलर असल्याचं सांगत पोलिसांची दिशाभूल केली, मात्र त्यानंतर पोलिसांनी त्याचा फोन, त्याच्या जवळील सर्व कॅप्सूल जप्त केल्या. काही लोकांनी या गोळ्या खाल्ल्यानंतर त्यांना पोटदुखी, उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्रास झालेल्या लोकांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. गोळ्या दिलेल्या व्यक्तीवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला पकडलं. त्यानंतर आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली. त्यावेळी त्याच्या घरात १४,९०० कॅप्सूल आणि ५० किलो झिंक फॉस्फाईड आढळलं.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी सुरू आहे. आरोपीने विषारी गोळ्या तयार केल्याचं कबूल केलं आहे. आता पोलीस आरोपीचं कोणतं दहशतवादी कनेक्शन आहे का, त्याचा या विषारी गोळ्यांमागचा हेतू काय होता याचा तपात सुरू आहे. मात्र भर मुंबईत, भर गर्दीत घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.