मुंबईतील दांपत्याने विदेशवारी रद्द करुन शहिदाच्या कुटुंबीयाला केली मदत, निर्माण केला देशप्रेमाचा नवा आदर्श

Published : May 14, 2025, 10:30 AM ISTUpdated : May 14, 2025, 03:18 PM IST
mumbai couple

सार

मुंबईतील एका दांपत्याने विदेश वारी रद्द करुन त्यातून शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना मदत दिली आहे. त्यांच्या या पावलाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

मुंबई - पहलगाम (काश्मीर) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोशल मीडियापासून ते संसदेत, सर्वत्र देशवासीयांनी आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त केल्या. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतातील पर्यटकांनी आपली नियोजित पर्यटनयात्रा रद्द केली. यामुळे देशात युद्धजन्य परिस्थितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला असून, सीमारेषेवर चकमकी, गोळीबार आणि दोन्ही देशांच्या लष्करी कारवायांना वेग आला आहे. 7 मे रोजी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे 9 अड्डे नेस्तनाबूत केल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून देण्यात आली आहे. यानंतर उरी सेक्टर, पूँछ, आणि एलओसीवर चकमकी वाढल्या. या संघर्षात, मुंबईच्या घाटकोपरमधील मुरली नाईक हे जवान पाकिस्तानशी लढताना वीरमरण आले. मजूर बापाचा मुलगा मुरली देशासाठी शहीद झाला, ही बातमी माध्यमांतून समोर आल्यानंतर सर्वत्र शोककळा पसरली.

मुंबईतील जोडप्याची आदर्शवत कृती

या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील एका जोडप्याने अनोखी आणि प्रेरणादायी कृती केली आहे. गेले अनेक महिने परदेशवारीची तयारी करत असलेल्या या जोडप्याने, देशासाठी लढणाऱ्या जवानांच्या बलिदानाचा आदर म्हणून आपली फॉरेन ट्रीप रद्द केली आहे. त्यांनी पिकनिकसाठीची रक्कम, तब्बल ₹1,09,001, शहीद मुरली नाईक यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी दिली आहे.

या दातृत्वाची माहिती एका इन्स्टाग्राम पेजवरून फोटोसह शेअर करण्यात आली. फोटो आणि पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली असून, देशभरातून त्या जोडप्याच्या निर्णयाचे कौतुक होत आहे. "जेव्हा देशाचे जवान सीमारेषेवर जीवाची बाजी लावत आहेत, तेव्हा आपल्याला मजा करण्याचा नैतिक अधिकार नाही," असे म्हणत त्यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली आहे.

शहीद मुरली नाईक: अभिमानास्पद बलिदान

उरी सेक्टरमध्ये सुरू असलेल्या संघर्षात शहीद झालेले मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशातील असले तरी, त्यांचे कुटुंब मुंबईच्या घाटकोपरमधील कामराज नगर परिसरात राहत होते. त्यांचे वडील मजूर असून, संपूर्ण कुटुंब सामान्य जीवन जगत होते. नुकतीच मुरली यांची आई-वडील गावच्या जत्रेसाठी आंध्र प्रदेशात गेले होते. तिथेच त्यांना मुरली शहीद झाल्याची बातमी मिळाली.

या बातमीनंतर गावात आणि मुंबईत दुःखाची लाट उसळली. आईच्या आक्रोशाने उपस्थितांचे मन हेलावून टाकले. मात्र, त्यांचे वडील अत्यंत धीराने म्हणाले, "माझा मुलगा देशासाठी शहीद झाला... या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे."

देशभरातून श्रद्धांजली

मुरली नाईक यांच्या शहिदकीची दखल देशभर घेतली जात असून, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहिली आहे. सोशल मीडियावर हजारो लोकांनी मुरली यांच्या शौर्याला सलाम करत त्यांच्यासाठी श्रद्धांजली संदेश लिहिले आहेत.

या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, देशभक्ती ही फक्त सैनिकांचीच नव्हे, तर प्रत्येक सामान्य नागरिकाची जबाबदारी आहे. मुंबईतील या जोडप्याने देशप्रेमाचा जो आदर्श उभा केला आहे, तो प्रेरणादायी असून, असेच छोटे मोठे निर्णयच देशाला एकसंध ठेवतात.

PREV

Recommended Stories

Mega Block : मध्य रेल्वेचा चार दिवसांचा रात्रीचा ब्लॉक; 12 गाड्यांच्या वेळेत बदल, कधी आणि कुठे जाणून घ्या!
पश्चिम रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय! 15 डब्यांची लोकल 'या' स्टेशनपर्यंत धावणार! प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा