
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑटो-रिक्षाच्या भाड्यात 1 रुपया, तर काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या भाड्यात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता पहिल्या 1.5 किलोमीटरसाठी रिक्षाचे किमान भाडे 27 रुपये, तर टॅक्सीचे किमान भाडे 33 रुपये असणार आहे.
महानगर गॅस लिमिटेडने (MGL) मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे एमएमआर मध्ये सीएनजीचा दर आता 88 रुपये प्रति किलो झाला आहे. यानंतर रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यातही सुधारणा करण्यात आली आहे.
एमएमआरटीए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने खटुआ समितीने निश्चित केलेल्या सूत्रानुसार भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. या सूत्रात इंधनाच्या किमतीसह वाहन चालवण्याचा इतर खर्च विचारात घेतला जातो. नवीन दरांनुसार टॅक्सीचे भाडे 20.66 रुपयांवरून 21.90 रुपये प्रति किलोमीटर, तर रिक्षाचे भाडे 17.14 रुपयांवरून 18.22 रुपये प्रति किलोमीटर करण्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तब्बल 18 महिन्यांनंतर बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी 2025 पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात प्रत्येकी 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. एमएमआरमध्ये 4.5 लाखांहून अधिक रिक्षा आणि 50 हजारांहून अधिक काळ्या-पिवळ्या टॅक्सी असून, त्यापैकी बहुतांश वाहने सीएनजीवर चालतात.
नवीन भाडे आकारण्यासाठी चालकांना इलेक्ट्रॉनिक मीटरचे कॅलिब्रेशन करून घ्यावे लागणार आहे. मीटरचे कॅलिब्रेशन होईपर्यंत आरटीओने मंजूर केलेले नवीन भाडे तक्ते जारी करून त्यानुसार भाडे आकारता येणार आहे. तसेच चालकांना मीटर कॅलिब्रेशनसाठी नोव्हेंबर अखेरपर्यंत तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मीटरचे कॅलिब्रेशन न करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली आहे.