
Mumbai Auto Fare Hike : इंधन दरवाढीचा फटका आता थेट मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासावर बसण्याची चिन्हे दिसत आहेत. एलपीजी आणि पीएनजीनंतर आता रिक्षा प्रवासही महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील रिक्षा भाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून लवकरच यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (MMRTA) च्या आगामी बैठकीत रिक्षा भाडेवाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरच रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
या संभाव्य भाडेवाढीमागे सीएनजी दरांमध्ये झालेली सततची वाढ हे मुख्य कारण असल्याचे सांगितले जात आहे. रिक्षाचालक संघटनांचे म्हणणे आहे की सध्याच्या दरात रिक्षा चालवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही. मुंबई रिक्षामेन्स युनियनने याबाबत RTO कडे निवेदन सादर केले असून तातडीने दरवाढ लागू करण्याची मागणी केली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, रिक्षाचे किमान भाडे सध्या 23 रुपयांवरून थेट 27 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली, तर 1 जुलैपासून नवीन दर लागू होऊ शकतात. यामुळे प्रत्येक प्रवासामागे प्रवाशांना किमान 4 रुपये अधिक मोजावे लागतील.
या निर्णयाचा परिणाम फक्त सामान्य रिक्षांवरच नाही तर शेअर रिक्षांच्या भाड्यावरही होणार आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या मासिक बजेटवर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.
संभाव्य भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. लोकल, मेट्रो आणि इतर वाहतूक पर्याय असतानाही रिक्षा भाडे वाढवणे अन्यायकारक असल्याचे अनेक प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. आता MMRTA या प्रस्तावावर अंतिम निर्णय काय घेते, याकडे संपूर्ण मुंबईचे लक्ष लागले आहे.