भिवंडीत उभारला सिरिया, स्वतंत्र देशाची घोषणा, १५ तरुणांची माथी भडकावून मंत्रिमंडळासारखी रचना, एटीएसच्या कारवाईत नाचन कुटुंबीयांच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश

Published : Jun 04, 2025, 08:58 AM IST
Terrorist

सार

नाचन कुटुंबीयांनी देशविघातक कृत्यांसाठी एक स्लिपर सेल उभा केला होता. या स्लिपर सेलमार्फत मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना भारतविरोधात चिथावणी देणे, देशात शरीयत कायद्यानुसार स्वतंत्र इस्लामी राष्ट्र निर्माण करण्याचा कट रचला होता.

ठाणे - भिवंडी तालुक्यातील पडघा परिसरात महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) टाकलेल्या छाप्यात अत्यंत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नाचन कुटुंबीयांनी देशविघातक कृत्यांसाठी एक स्लिपर सेल उभा केला होता, अशी माहिती तपास यंत्रणांनी उघड केली आहे. या स्लिपर सेलमार्फत मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना भारतविरोधात चिथावणी देणे, देशात शरीयत कायद्यानुसार स्वतंत्र इस्लामी राष्ट्र निर्माण करण्याचा कट रचणे, अशा प्रकारची गंभीर कारवाया सुरु असल्याचे समोर आले आहे.

एटीएसने सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भिवंडीच्या पडघ्यातील बोरिवली गावात साकिब नाचनच्या घरी छापा टाकला. या छाप्यात ठाणे पोलिसांचाही सहभाग होता. साकिब नाचन हा सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) ताब्यात असलेला दहशतवादी आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे हा छापा घालण्यात आला. यावेळी साकिब नाचनचा मुलगा शमिल नाचन आणि भाऊ आकीब नाचन यांनाही अटक करण्यात आली आहे.

इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याचा कट

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, ISISच्या सिरीयातील धोरणाच्या धर्तीवर भारतात 'इस्लामी राष्ट्र' स्थापन करण्याच्या उद्देशाने नाचन कुटुंबीयांनी हा स्लिपर सेल तयार केला होता. या सेलमध्ये १५ तरुणांची भरती करून त्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे, या तरुणांना एखाद्या देशाच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांप्रमाणे जबाबदाऱ्या दिल्या गेल्या होत्या. ‘शरीयत ए अल शाम’ या इस्लामी कायद्यानुसार स्वतंत्र प्रशासन व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न सुरू होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बोरीवली गाव ‘स्वतंत्र देश’ म्हणून घोषित?

एटीएसच्या तपासात आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली. नाचन कुटुंबीयांनी बोरीवली गावाला ‘शरीयत ए अल शाम’ कायद्याअंतर्गत स्वतंत्र देश घोषित केले होते, असा गुप्त संदेश हाती लागला आहे. या घोषणेनंतर त्या भागात बाह्य हस्तक्षेप टाळण्यासाठी स्थानिक तरुणांच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा उभारण्याचा डाव असल्याचाही संशय तपास यंत्रणांना आहे.

देशभरात एकाचवेळी छापेमारी

या प्रकरणाची व्याप्ती केवळ भिवंडीपुरती मर्यादित नाही. एनआयएने पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये एकाचवेळी छापे टाकून एक मोठा नेटवर्क उध्वस्त केला आहे. या छाप्यांतून पडघा गावातून एकूण १५ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दहशतवादाशी संबंधित साहित्य, डिजिटल उपकरणं, सोशल मिडियावर वापरले जाणारे कनेक्शन आणि कट रचल्याचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत.

पुढील तपास सुरू

एनआयए आणि एटीएस संयुक्तपणे या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आणखी काही आरोपींचा शोध सुरु आहे. या कटामध्ये देशांतर्गत व परदेशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचाही तपास सुरु आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो लक्ष द्या! 8–9 डिसेंबरला 24 तास पाणी कपात; 14 विभागांवर मोठा परिणाम
Mumbai Local : मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! सुरक्षेसाठी केंद्राचा 'मास्टर प्लॅन', लोकलमध्ये 'हा' जबरदस्त बदल होणार!