
मुंबई: मुंबईच्या गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात अखेरची पायरी पार करण्यात आली असून, गणपतीची मूर्ती अत्याधुनिक तराफ्यावर यशस्वीपणे विराजमान झाली आहे. यानंतर मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांशी संवाद साधून विसर्जनासंबंधी महत्त्वाची माहिती दिली.
सुधीर साळवी यांनी सांगितलं की, "कोळी बांधवांशी चर्चा करून आणि समुद्राच्या भरती-ओहोटीचा विचार करून, लालबागच्या राजाचे विसर्जन आज रात्री 10:30 ते 11:00 दरम्यान पार पडेल." सकाळी विसर्जनासाठी प्रयत्न केला असला, तरी समुद्राची भरती अधिक असल्याने तो थांबवावा लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं.
साळवी म्हणाले, "अरबी समुद्राची भौगोलिक रचना आणि हवामान लक्षात घेता, भरती अपेक्षेपेक्षा लवकर आल्याने मूर्ती ठेवणे कठीण झाले. आम्ही एक प्रयत्न केला, परंतु लाखो भक्तांची श्रद्धा लक्षात घेता शास्त्रोक्त पद्धतीनेच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला."
सुधीर साळवी यांनी माध्यमांच्या सहकार्याबद्दल विशेष कृतज्ञता व्यक्त केली. "मुंबई पोलिस आणि महापालिकेने भरतीच्या वेळेस आम्हाला मदत केली. माध्यमं आमच्या सोबत खंबीरपणे उभी राहिली, यासाठी मनःपूर्वक आभार," असं ते म्हणाले.
जरी मूर्ती तराफ्यावर यशस्वीपणे चढवण्यात आली असली, तरी आता समुद्रात पाणी नसल्यानं तराफा हालवणं शक्य नाही, हे मंडळासमोरचं नवीन आव्हान आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ओहोटी सुरू असल्याने, त्यानंतरच समुद्राची पातळी वाढेल आणि तराफा पुढे नेण्यास योग्य वेळ मिळेल.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे विसर्जनासाठी योग्य वेळ साधणं कठीण ठरतंय. "या हवामानामुळे आम्हाला विसर्जन थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला. पण आज रात्री विसर्जन पार पाडू, हे आम्ही भाविकांना आश्वस्त करत आहोत," असं साळवी म्हणाले.
लालबागचा राजा म्हणजे कोट्यवधी भाविकांची श्रद्धा. त्यामुळे विसर्जन कोणत्याही गडबडीत न करता, संपूर्ण नियोजनानुसार आणि शास्त्रोक्त पद्धतीने करण्याचा निर्धार मंडळाने व्यक्त केला आहे.