
iPhone 17 Launched : ॲपलने अखेर आपला iPhone 17 लाँच केला आहे, ज्याची लोक आतुरतेने वाट पाहत होते. या नवीन फोनबद्दल लोकांमध्ये इतकी क्रेझ पाहायला मिळाली की, एक दिवस आधी म्हणजेच 18 सप्टेंबरच्या संध्याकाळपासूनच लांबच लांब रांगा लागायला सुरुवात झाली. मुंबई आणि दिल्लीतील अशीच काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी पाहून लोकांमध्ये आयफोन 17 साठी किती उत्साह आहे याचा अंदाज लावता येतो. मुंबईत लोक बीकेसी मॉलबाहेर रांगा लावून उभे होते. सकाळी तर पोलिसांनी बळाचा वापर करावा लागला. यावेळी काही तरुणांनी हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे वृत्त आहे. त्यानंतरच लोकांना मॉलच्या आत जाता आले.
दिल्लीतील दक्षिण दिल्लीतील सिलेक्ट सिटी मॉल, साकेत येथे लोक फोन खरेदी करण्यासाठी मध्यरात्री 12 वाजल्यापासून रांगेत उभे होते. वसंत कुंज परिसरातही लोक आपल्या बारीची वाट पाहताना दिसले.
फोन खरेदी करण्यासाठी एवढी लांब रांग लागली कारण ग्राहक नवीन आयफोन मॉडेल सर्वात आधी मिळवण्यासाठी उत्सुक होते. लोक रात्री 12 वाजल्यापासून मॉलबाहेर उभे होते जेणेकरून सकाळी फोन लाँच होताच तो खरेदी करता येईल. अशा लांब रांगा अनेकदा नवीन आणि लोकप्रिय उत्पादनांच्या लाँचवेळी पाहायला मिळतात. आता आयफोन 17 साठीही तेच दृश्य समोर आले आहे. मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील ॲपल शोरूमबाहेरही शेकडो लोक उभे असलेले दिसले. काही लोक 7 ते 8 तासांपासून वाट पाहत होते, तर अनेकांनी आधीच आयफोन 17 बुक केला होता. गंमत म्हणजे ज्यांचे बुकिंग होऊ शकले नाही, तेही नवीन आयफोन मिळेल या आशेने रांगेत उभे होते.
ॲपलचे नवीन आयफोन मॉडेल आता भारतातही उपलब्ध आहेत. आयफोन 17 प्रो ची किंमत 1,49,900 रुपयांपासून सुरू होते, तर आयफोन 17 ची किंमत 82,900 रुपयांपासून आहे. आयफोन 17 च्या लाँचने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, भारतात ॲपलची क्रेझ वाढतच चालली आहे. या फोनचा नवीन आणि आकर्षक रंग लोकांना सर्वाधिक आवडत आहे. तसेच, दीर्घ बॅटरी लाईफ आणि उत्तम कॅमेरा क्वालिटीने तरुणांपासून ते व्यावसायिक वर्गापर्यंत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.